मेहेगाव खून प्रकरण उघड; २४ तासांत तुमसर पोलिसांकडून तिघांना अटक

    24-Jan-2026
Total Views |
 
arrest
 Image Source:(Internet)
तुमसर (भंडारा) :
मेहेगाव (Mehegaon) येथे घडलेल्या निर्घृण खून प्रकरणात तुमसर पोलिसांनी वेगवान तपास करत अवघ्या २४ तासांत गुन्हा उघडकीस आणत तिघा आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस स्टेशन तुमसर येथे अप.क्र. 33/2026 नुसार भा.न्या.सं. कलम 103(1) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
 
फिर्यादी पंकज गणेश राणे (वय 33, रा. मेहेगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 22 जानेवारी रोजी रात्री 8 ते 23 जानेवारी रोजी सकाळी 11.45 वाजेदरम्यान मेहेगावपासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर उत्तर दिशेला अज्ञात व्यक्तींनी त्यांचे लहान भाऊ कपिल गणेश राणे (वय 28) यांच्यावर धारदार शस्त्राने गळा, डोके, कपाळ व कुशीवर वार करून निर्घृण हत्या केली.
 
गुन्हा नोंद होताच आरोपी अज्ञात असल्याने तुमसर पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा, भंडारा यांच्या संयुक्त पथकांनी तांत्रिक विश्लेषण व गोपनीय सूत्रांच्या आधारे तपास सुरू केला. मिळालेल्या माहितीनुसार तपास पथकाने नागपूर जिल्ह्यातील रामटेक परिसरात शोध घेऊन आरोपींचा माग काढला आणि गुन्हा उघडकीस आणला.
 
या प्रकरणात अटक करण्यात आलेले आरोपी पुढीलप्रमाणे आहेत —
भूषण सुनील लांजेवार (वय 19, रा. मेहेगाव, ता. तुमसर, जि. भंडारा),
सार्थक नंदकिशोर कठारे (वय 20, रा. बिट गणेशपूर, पोस्ट टाकरघाट, ता. हिंगणा, जि. नागपूर),
निलेश नरेश नागमोते (वय 19, रा. पट गोवारी, ता. रामटेक, जि. नागपूर).
 
ही कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन व उपविभागीय पोलीस अधिकारी विलास काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तपासासाठी पोलीस निरीक्षक गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक प्रविण सयाम, श्रीचंद गंगवानी तसेच तुमसर पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विशेष परिश्रम घेतले.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रविण सयाम, पोलीस स्टेशन तुमसर करीत आहेत.