प्रजासत्ताक दिनापूर्वी मोठे सुरक्षा यश; दहशतवादी कट उधळला

24 Jan 2026 16:17:13
 
Security Success
Image Source:(Internet) 
नवी दिल्ली :
प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) पार्श्वभूमीवर देशाच्या सुरक्षेसाठी मोठा धोका ठरू शकणारा दहशतवादी कट पंजाब पोलिसांनी वेळीच उधळून लावला आहे. होशियारपूर येथे राबविण्यात आलेल्या विशेष कारवाईत बंदी घालण्यात आलेल्या बब्बर खालसा इंटरनॅशनल (BKI) या संघटनेशी संबंधित आणि पाकिस्तानच्या ISI समर्थित दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश करण्यात आला आहे.
 
या कारवाईदरम्यान पोलिसांनी चार संशयित दहशतवाद्यांना अटक केली असून त्यांच्याकडून सुमारे 2.5 किलो RDX वापरून तयार करण्यात आलेला IED, तसेच दोन पिस्तुले जप्त करण्यात आली आहेत. स्फोटके मोठ्या हल्ल्यासाठी वापरण्याची तयारी असल्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे.
 
पंजाबचे पोलीस महासंचालक (DGP) गौरव यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे दिलजोत सिंग, हरमन सिंग उर्फ हॅरी, अजय उर्फ माहिरा आणि अरशदीप सिंग उर्फ अरथ कोंडोला अशी आहेत. हे सर्व आरोपी SBS नगर जिल्ह्यातील राहोण परिसरातील रहिवासी आहेत.
 
या तातडीच्या आणि अचूक कारवाईमुळे प्रजासत्ताक दिनापूर्वी संभाव्य मोठा दहशतवादी हल्ला टळला असून नागरिकांच्या सुरक्षेला मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून या कटामागे आणखी कोण सामील आहे का, तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील संबंधांचा तपासही करण्यात येत आहे.
Powered By Sangraha 9.0