Image Source:(Internet)
नवी दिल्ली :
प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) काही दिवस आधी पंजाबमध्ये रेल्वे ट्रॅकवर स्फोट झाल्याची घटना समोर आली असून त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना फतेहगड साहिब जिल्ह्यातील सिरहिंद भागातील खानपूर गावाजवळ घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे ९.५० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. त्याच वेळी रेल्वे ट्रॅकवरून एक मालगाडी जात असताना स्फोट झाला. या स्फोटामुळे सुमारे १२ फूट रेल्वे रुळांचे नुकसान झाले असून मालगाडीच्या इंजिनालाही फटका बसला आहे.
या स्फोटात मालगाडीचा चालक गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस व सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या असून परिसरातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
रोपड रेंजचे डीआयजी नानक सिंग यांनी सांगितले की, स्फोट तीव्र स्वरूपाचा नसला तरी रेल्वे ट्रॅक आणि गाडीचे नुकसान झाले आहे. या प्रकरणाचा शास्त्रीय पद्धतीने तपास करण्यात येत असून अन्य तपास यंत्रणांचीही मदत घेतली जात आहे.
दरम्यान, देशभरात प्रजासत्ताक दिनाच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी सुरक्षा कडक करण्यात आली असून, या घटनेनंतर पंजाबमध्येही विशेष सतर्कता बाळगण्यात येत आहे.