Image Source:(Internet)
मुंबई :
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin scheme) लाभ घेणाऱ्या महिलांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. योजनेच्या अंमलबजावणीत उद्भवलेल्या तांत्रिक समस्या, e-KYC मधील त्रुटी तसेच रखडलेले हप्ते यांसाठी महिलांना आता शासकीय कार्यालयांमध्ये वारंवार जावे लागणार नाही.
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी योजनेसंदर्भातील तक्रारी, शंका व अडचणी दूर करण्यासाठी ‘१८१’ हा विशेष हेल्पलाईन क्रमांक सुरू केल्याची माहिती दिली. या क्रमांकावर संपर्क साधल्यास लाभार्थींना थेट मार्गदर्शन मिळणार असून, कॉल हाताळण्यासाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
e-KYC प्रक्रियेत चुकीचा पर्याय निवडल्याने अनेक पात्र महिलांचे हप्ते थांबले होते. अशा प्रकरणांमध्ये आता अंगणवाडी सेविकांमार्फत लाभार्थींच्या घरी जाऊन प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे. त्यामुळे पात्र महिलांचे रखडलेले लाभ पुन्हा सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
योजनेअंतर्गत ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत e-KYC पूर्ण करणे आवश्यक होते. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे अनेक महिलांना ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आली नव्हती. याचा परिणाम म्हणून विशेषतः विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला होता. ही बाब लक्षात घेत सरकारने तातडीने हस्तक्षेप करून उपाययोजना केल्या आहेत.
दरम्यान, नोव्हेंबर व डिसेंबर २०२५ मधील प्रलंबित हप्ते जानेवारी महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात लाभार्थींच्या खात्यात जमा करण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. महिलांचे आर्थिक सबलीकरण, आरोग्य व पोषण सुधारणा आणि थेट लाभ हस्तांतरण हा या योजनेचा मुख्य उद्देश असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले.
ज्या महिलांना अद्याप हप्ता मिळालेला नाही किंवा अर्जात दुरुस्ती करायची आहे, त्यांनी त्वरित ‘१८१’ हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.