Image Source:(Internet)
मुंबई :
आज हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची १०० वी जयंती साजरी होत असताना राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. जन्मशताब्दी वर्षात शिवसेनेचा महापौर व्हावा, अशी मागणी सुरू असतानाच खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचा जुना फोटो समाजमाध्यमांवर शेअर करत त्यांना आदरांजली वाहिली. बाळासाहेब हे आपले मार्गदर्शक होते, त्यांच्याकडून प्रेरणा व ऊर्जा मिळाली, त्यांनी महाराष्ट्र आणि देशाला दिशा दिली, अशा भावना मोदींनी आपल्या पोस्टमध्ये व्यक्त केल्या. मात्र, याच पोस्टवरून संजय राऊत यांनी खोचक टोला लगावला.
राऊत म्हणाले, ज्या बाळासाहेब ठाकरे यांना मार्गदर्शक मानल्याचे मोदी सांगतात, त्याच बाळासाहेबांची शिवसेना भाजपने फोडली. शिवसेनाप्रमुखांचे पद एकनाथ शिंदे नावाच्या व्यक्तीकडे सोपवले. त्यामुळे आता पंतप्रधान मोदी एकनाथ शिंदे यांच्याकडून ऊर्जा, प्रेरणा आणि मार्गदर्शन घेतात का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
लोकमान्य टिळकांनंतर बाळासाहेब ठाकरे हे खऱ्या अर्थाने लोकमान्य नेते होते, असे सांगत राऊत यांनी बाळासाहेबांच्या विचारांचा गौरव केला. बाळासाहेबांनी मराठी माणूस असो किंवा हिंदू समाज, एकजुटीची ताकद काय असते हे देशाला दाखवून दिले. ऐक्याची वज्रमूठ कोणत्याही संकटावर मात करू शकते, हे त्यांनी आपल्या कार्यातून सिद्ध केले, असेही राऊत म्हणाले.
आज शिवसेनेच्या वतीने बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी वर्षानिमित्त षणमुखानंद सभागृहात विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे उपस्थित राहणार असल्याची माहितीही संजय राऊत यांनी दिली. बाळासाहेबांनी सामान्य माणसाला आत्मविश्वास दिला, त्याला शूर बनवले आणि त्याच्या न्यायहक्काची जाणीव करून दिली. त्यामुळे बाळासाहेबांचे स्मरण महाराष्ट्राला कायम राहील आणि त्यांचे विस्मरण कधीच होणार नाही, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.
दरम्यान, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील शिंदे सेना-मनसे युतीच्या चर्चांवर संजय राऊत यांनी यावेळी भाष्य करणे टाळले.