पीएम किसान योजना:शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार, २२ वा हप्ता फेब्रुवारीत जमा होण्याची शक्यता

23 Jan 2026 17:31:28
 
PM Kisan Yojana
 Image Source:(Internet)
नागपूर :
शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. प्रधानमंत्री किसान (PM Kisan) सन्मान निधी योजनेअंतर्गत मिळणाऱ्या २२ व्या हप्त्याची प्रतीक्षा आता लवकरच संपण्याची शक्यता आहे. देशभरातील कोट्यवधी शेतकरी या योजनेचा लाभ घेत असून, पुढील हप्ता कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 
केंद्र सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा, यासाठी पीएम किसान योजना सुरू केली आहे. या योजनेत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये दिले जातात. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तीन समान हप्त्यांमध्ये जमा केली जाते.
 
पीएम किसान योजनेचे हप्ते साधारणपणे दर चार महिन्यांनी वितरित केले जातात. मागील हप्ता ऑक्टोबर महिन्यात जमा झाल्याने पुढील चार महिन्यांचा कालावधी फेब्रुवारीत पूर्ण होत आहे. त्यामुळे २२ वा हप्ता फेब्रुवारी महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, याबाबत केंद्र सरकारकडून अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.
 
दरम्यान, शेतकऱ्यांनी केवळ हप्त्याची वाट पाहून न राहता आवश्यक प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ई-केवायसी अपूर्ण असल्यास अनेक शेतकऱ्यांचा हप्ता अडकतो. त्यामुळे आपली ई-केवायसी पूर्ण आहे की नाही, याची खात्री करणे गरजेचे आहे. तसेच काही राज्यांमध्ये भू-सत्यापन प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली असून, ती पूर्ण न केल्यास देखील हप्ता मिळण्यात अडथळा येऊ शकतो.
 
याशिवाय आधार कार्ड, बँक खाते आणि जमीन नोंदी यामधील माहिती अचूक असणे आवश्यक आहे. नावातील स्पेलिंग, खाते क्रमांक किंवा आधार क्रमांकातील अगदी छोटी चूक सुद्धा हप्ता रोखू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिकृत पीएम किसान पोर्टलवर किंवा जवळच्या कृषी कार्यालयात जाऊन आपली सर्व माहिती वेळेत तपासून अपडेट करून घ्यावी. आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यास २२ व्या हप्त्याचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
Powered By Sangraha 9.0