राज्यातील 7 जिल्ह्यांवर संकट; हवामान विभागाचा मोठा इशारा, अवकाळी पावसाचा अलर्ट जारी

23 Jan 2026 14:41:39
 
Unseasonal rain
 Image Source:(Internet)
नागपूर :
राज्यात सध्या हवामानात सातत्याने बदल होत असून कधी पाऊस तर कधी थंडी, तर कधी उकाडा अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जानेवारी महिन्यातही पावसाची शक्यता कायम असून पुढील काही दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा (Unseasonal rain) इशारा देण्यात आला आहे.
१ जानेवारी रोजी राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर वातावरणात सतत बदल होत असल्याचे चित्र दिसत आहे. उत्तर भारतात कडाक्याची थंडी असली तरी महाराष्ट्रात मात्र गारठा मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींचा प्रभाव अत्यंत कमी असल्यामुळे तापमानात वाढ होत आहे.
मॉन्सून जाऊन काही महिने उलटून गेले असतानाही पावसाने राज्यातून माघार घेतलेली नाही. देशातील अनेक भागांत अद्याप पावसाचे ढग सक्रिय असून त्याचा परिणाम महाराष्ट्रावरही होत आहे. सतत बदलणाऱ्या हवामानाचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.
पुण्यात थंडी ओसरली, उकाड्यात वाढ-
पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर कमी झाला असून उकाड्यात वाढ झाली आहे. मागील आठवड्यात किमान तापमानात घट होऊन गारठा वाढला होता. मात्र, गेल्या दोन दिवसांत किमान तापमानात सुमारे तीन अंश सेल्सिअसची वाढ झाली असून कमाल तापमानात दोन अंशांची घट नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे थंडी ओसरली असून उकाडा अधिक जाणवू लागला आहे.
ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता-
भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, राज्यातील अनेक भागांत ढगाळ वातावरण राहणार असून पावसाचीही शक्यता आहे. ढगाळ हवामानामुळे उकाडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या राज्यातील बहुतांश ठिकाणी किमान तापमान 11 अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदवले जात असून, थंडी जवळपास गायब झाल्याचे स्पष्ट होत आहे. काही दिवसांपूर्वी राज्यातील अनेक भागांत पारा 5 ते 6 अंशांपर्यंत घसरला होता.
या 7 जिल्ह्यांना इशारा-
हवामान विभागाने धुळे, पालघर, नाशिक, जळगाव, नंदूरबार, अहिल्यानगर आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. पुढील काही दिवसांत हवामानात आणखी बदल होण्याची शक्यता असून, जानेवारी महिना संपायला काही दिवस शिल्लक असतानाही राज्यात पावसाची स्थिती कायम राहण्याची चिन्हे दिसत आहेत.
अवकाळी पावसामुळे शेतकरी, नागरिक आणि स्थानिक प्रशासनाने खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0