महायुतीत मनसेही सहभागी? एकनाथ शिंदेंचं स्पष्ट वक्तव्य

    23-Jan-2026
Total Views |
 
Eknath Shinde
 Image Source:(Internet)
मुंबई :
नुकताच बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त आयोजित कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका मांडली. यावेळी बोलताना त्यांनी महापालिका निवडणुकीतील यश, बाळासाहेब ठाकरे यांची स्वप्नपूर्ती, तसेच आगामी राजकीय समीकरणांवर भाष्य केले.
 
एकनाथ शिंदे म्हणाले, “महापालिका निवडणुकीत भाजपानंतर शिवसेना (शिंदे गट) हा दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष ठरला आहे. चांदा ते बांदा शिवसेना घराघरात पोहोचली असून हा पक्ष सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.”
 
यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नांचा उल्लेख करत सांगितले की, “अयोध्येत राम मंदिर उभारणे आणि जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवणे ही बाळासाहेबांची स्वप्नं होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही दोन्ही स्वप्नं पूर्ण केली.”
 
मुख्यमंत्री सध्या दावोस दौऱ्यावर असून त्यांनी त्यांचे अभिनंदन केल्याचेही शिंदे यांनी सांगितले.
 
बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी निमित्त मोठ्या घोषणा-
एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त विविध लोककल्याणकारी अभियानांची घोषणा केली.
त्यामध्ये ‘बाळासाहेब ठाकरे – आरोग्य आपल्या दारी’, ‘नागरिक लोककल्याण अभियान’, तसेच गडकोट किल्ले स्वच्छता व प्लास्टिकमुक्त अभियान यांचा समावेश आहे.
29 महापालिका आणि 394 नगरपरिषदांमध्ये लोककल्याण अभियान
महापालिकांना 3 कोटी, नगरपालिकांना 1 कोटी रुपयांचा निधी
मराठी भाषेसाठी 100 कोटींची तरतूद
महिला बचत गट सक्षमीकरणासाठी नगरविकास विभागाकडून 100 कोटी
पालिका क्षेत्रातील उत्कृष्ट शाळांना 10 लाख, 7 लाख व 3 लाखांची बक्षिसे
गडकिल्ले प्लास्टिकमुक्त करण्यासाठी विशेष मोहीम
स्वच्छ पाणीपुरवठा, कॅशलेस उपचाराचा विस्तार
शिवभक्त एनजीओंना एक लाख मानधन
मनसेबाबत थेट विधान-
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या राजकारणावर बोलताना एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाचे विधान केले. ते म्हणाले,
“महायुतीसोबत मनसेही आमच्यासोबत येत आहे. महापौर पदासाठी कोणतीही रस्सीखेच नाही. बहुमत नसणाऱ्यांनी स्वप्न पाहणे चुकीचे आहे. विकासाच्या मुद्द्यावर मनसेने आम्हाला साथ दिली आहे.”
 
नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकांमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून, शिवसेना (शिंदे गट) दुसऱ्या क्रमांकावर आहे. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगरसह अनेक महापालिकांमध्ये महायुतीची सत्ता आली आहे.
 
मनसेच्या संभाव्य सहभागामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.