बाळासाहेबांची १०० वी जयंती; राज ठाकरेंची भावनिक पोस्ट, मराठी माणसाला दिला 'हा' शब्द!

23 Jan 2026 11:42:48
 
Balasaheb
 Image Source:(Internet)
मुंबई :
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब (Balasaheb) ठाकरे यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त दादर येथील शिवतीर्थावर स्मृतीस्थळावर शिवसैनिकांची मोठी गर्दी उसळली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर भावनिक आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारी सखोल पोस्ट शेअर केली असून ती सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.
 
राज ठाकरे यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचा जुना ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केला आहे. या छायाचित्रात राज ठाकरे हे बाळासाहेबांची शाल हातात घेऊन व्यासपीठावर उभे असल्याचे दिसते. या फोटोला त्यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देणारे भावपूर्ण शब्द जोडले आहेत.
 
पोस्टमध्ये राज ठाकरे म्हणतात, बाळासाहेब ठाकरे यांचा प्रभाव हा काळाच्या पलीकडचा असून एखादी व्यक्ती हयात नसतानाही राजकारण आणि समाजकारणाला दिशा देत राहते, हे दुर्मिळ आहे. बाळासाहेब केवळ शतकीच नव्हे तर द्विशतकी जन्मवर्षातही लोकांच्या स्मरणात राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मात्र त्या काळात मराठी माणूस दुभंगलेला, खचलेला किंवा अन्याय सहन करणारा नसावा, ही अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
 
सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना राज ठाकरे यांनी निष्ठा विकल्या जात असल्याची, तत्त्वे सहज फेकली जात असल्याची टीका केली. बाळासाहेबांच्या काळात सत्ता हे अंतिम उद्दिष्ट नव्हते, तर सामान्य कार्यकर्त्याला सत्तेत सहभागी करण्याचे समाधान त्यांना महत्त्वाचे वाटत होते, असेही त्यांनी नमूद केले.
 
बाळासाहेब ठाकरे हे दूरदर्शी नेते होते. त्यांचे विचार आजही तितकेच सुसंगत असून भविष्यातही ते मार्गदर्शक ठरतील, असे सांगत राज ठाकरे यांनी बाळासाहेबांसारखी प्रतिभा पुन्हा होणे अशक्य असल्याचे मत व्यक्त केले. मात्र मराठी भाषा, मराठी प्रांत आणि मराठी माणसासाठी उभारलेला लढा कधीही थांबणार नाही, असा शब्द त्यांनी दिला.
 
राजकारणात कधी काळी लवचिक भूमिका घ्यावी लागली तरी ती व्यक्तिगत स्वार्थासाठी नसेल, असे ठामपणे सांगत राज ठाकरे यांनी ‘बाळासाहेब’ आणि ‘मराठी’ या दोन शब्दांवरील श्रद्धा कधीही कमी होणार नाही, असे स्पष्ट केले. पोस्टच्या शेवटी त्यांनी स्व. बाळासाहेब ठाकरे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने विनम्र अभिवादन केले.
 
दरम्यान, राज ठाकरे यांची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत असून अनेकांनी ती शेअर करत बाळासाहेबांच्या विचारांचा पुनरुच्चार केला आहे.
 
Powered By Sangraha 9.0