Image Source:(Internet)
नागपूर :
महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर विदर्भातील अनेक शहरांमध्ये महापौरपदासाठी (Mayor) राजकीय हालचालींना वेग आला होता. बहुमताची गणिते, आघाड्यांचे संकेत आणि अंतर्गत चर्चा सुरू असतानाच आज महापौरपदासाठीची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. त्यामुळे विदर्भातील प्रमुख महापालिकांमधील महापौरपद कोणत्या प्रवर्गाकडे जाणार, हे स्पष्ट झाले आहे.
नागपूर, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गोंदिया या महापालिकांकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. आज सकाळी ११ वाजता मंत्रालयात झालेल्या सोडतीनंतर या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
आरक्षण सोडतीनुसार अकोला आणि चंद्रपूर महापालिकांमध्ये महापौरपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. तर अमरावती महापालिकेत खुल्या प्रवर्गातील महापौराची निवड होणार आहे. राज्याचे उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये मात्र खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी महापौरपद आरक्षित करण्यात आले आहे.
जाहीर झालेलं महापौर आरक्षण-
- अकोला – ओबीसी (महिला)
- चंद्रपूर – ओबीसी (महिला)
- अमरावती – खुला प्रवर्ग
- नागपूर – खुला प्रवर्ग (महिला)
आरक्षण निश्चित झाल्यानंतर आता प्रत्येक महापालिकेत महापौरपदासाठी इच्छुक नगरसेवकांची हालचाल वाढण्याची शक्यता असून, पक्षांतर्गत राजकारण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.