जम्मू-काश्मीर: लष्कराचे वाहन २०० फूट दरीत कोसळले, ४ जवान शहीद, १२ जखमी

    22-Jan-2026
Total Views |
 
Jammu-Kashmir
 Image Source:(Internet)
डोडा (जम्मू-काश्मीर):
जम्मू-काश्मीरच्या (Jammu-Kashmir) डोडा जिल्ह्यात मंगळवारी एक भीषण अपघात घडला. भारतीय लष्कराचे ‘कॅस्पर’ (सैन्य वाहन) सुमारे २०० फूट खोल दरीत कोसळल्याने ४ जवान शहीद झाले असून १२ जवान जखमी झाले आहेत. जखमींपैकी किमान तीन जवानांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

भद्रवाह–चंबा मार्गावर अपघात-
प्राथमिक माहितीनुसार, हे लष्करी वाहन डोडा जिल्ह्यातील भद्रवाह–चंबा रोड मार्गावरून जात होते. वाहनात एकूण १७ जवान प्रवास करत होते. सर्व जवान एका उंच पर्वतीय पोस्टकडे जात असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे.
 
बचावकार्य युद्धपातळीवर-
अपघाताची माहिती मिळताच लष्कर, स्थानिक प्रशासन आणि बचाव पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. खोल दरीत कोसळलेल्या वाहनातून जवानांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य राबवण्यात आले. जखमी सैनिकांना घटनास्थळी प्राथमिक उपचार देण्यात आले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी उधमपूर येथे विमानाने हलवण्यात आले.
 
अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. लष्कर आणि स्थानिक प्रशासनाकडून तपास सुरू असून, रस्त्याची अवस्था, हवामान आणि तांत्रिक बाबींची सखोल चौकशी केली जात आहे.डोडा जिल्हा सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील मानला जातो. डोंगराळ व जंगली परिसर असल्याने येथे दहशतवादी हालचालींची शक्यता कायम असते. गुप्तचर अहवालांनुसार, डोडा आणि शेजारच्या किश्तवार जिल्ह्यात ३० ते ३५ पाकिस्तानी वंशाचे दहशतवादी सक्रिय असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे या भागात भारतीय सैन्याची सतत गस्त सुरू असते. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, शहीद जवानांना देशभरातून श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.