Image Source:(Internet)
मुंबई :
मुंबईतील मालाड पूर्व भागात मानवतेला लज्जास्पद ठरेल अशी धक्कादायक घटना समोर आली असून, एका २० वर्षीय तरुणाने अडीच महिन्यांच्या श्वान पिल्लावर लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे प्राणीप्रेमींसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
सदर प्रकरण प्युअर ॲनिमल लव्हर्स फाउंडेशन (PAL Foundation) या प्राणी कल्याण संस्थेच्या सतर्कतेमुळे प्रकाशात आले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओची दखल घेत प्राणी कार्यकर्ते आणि मुंबई पोलिसांनी संयुक्तरित्या तातडीची कारवाई केली. कुरार गावातील एका सार्वजनिक शौचालयात आरोपी आतून कडी लावून बसल्याचे आढळून आले. पोलिसांनी दरवाजा उघडण्याचे आवाहन केले असता त्याने प्रतिसाद दिला नाही. अखेर बळाचा वापर करून पोलिसांनी दरवाजा उघडत आरोपीला ताब्यात घेतले.
या अमानवी कृत्यात गंभीर जखमी झालेल्या श्वान पिल्लाला तत्काळ पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असून त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती पीएएल फाउंडेशनकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, पोलिसांनी आरोपीविरोधात भारतीय न्याय संहितेतील संबंधित तरतुदी तसेच प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
या घटनेनंतर सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, अशा विकृत प्रवृत्तींच्या वाढीबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. ही घटना केवळ एका प्राण्यावर झालेला अत्याचार नसून, समाजातील संवेदनशीलतेच्या ऱ्हासाचे भयावह प्रतिबिंब असल्याचे मत व्यक्त होत आहे.