Image Source:(Internet)
नागपूर :
माघ शुद्ध चतुर्थी अर्थात गणेश जयंतीनिमित्त (Ganesh Jayanti) नागपूरच्या प्रसिद्ध टेकडी गणेश मंदिरात भक्तीमय वातावरण अनुभवायला मिळत आहे. मंदिराला आकर्षक फुलांची सजावट आणि झगमगती विद्युत रोषणाईने सजवण्यात आले असून,
गुरुवार (२२ जानेवारी २०२६) पहाटेपासूनच विघ्नहर्त्या गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.
गणेश जयंती हा गणरायाच्या जन्मोत्सवाचा पवित्र दिवस मानला जातो. पुराणांनुसार, नरांतक राक्षसाचा संहार करण्यासाठी कश्यप ऋषींच्या वंशात ‘विनायक’ रूपात गणपतींचा अवतार झाला, म्हणूनच या तिथीस विनायकी चतुर्थी असेही म्हटले जाते. या दिवशी भक्तांकडून षोडशोपचार पूजा, तिळगुळाच्या लाडवांचा नैवेद्य आणि कुंदफुलांनी गणेश व सदाशिवाची आराधना केली जाते. रात्री जागरणाची परंपरा असल्याने या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी असेही संबोधले जाते.
बुद्धी, विवेक आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक असलेले गणपती बाप्पा सर्वसामान्यांच्या मनात विशेष स्थान राखून आहेत. सौम्य स्वभाव, कलासंवर्धन आणि सर्वधर्मसमभावाचे प्रतीक म्हणून गणरायांची उपासना आबालवृद्धांमध्ये मोठ्या श्रद्धेने केली जाते.
इतिहासानुसार, १७०२ साली गोंड राजा बख्त बुलंद शाह यांनी नागपूर शहराची स्थापना केली. त्यांच्या स्वप्नात गणपती बाप्पांनी दर्शन दिल्यानंतर टेकडीवरील या मंदिराची उभारणी झाल्याची आख्यायिका आहे. सुमारे अडीचशे वर्षांचा इतिहास लाभलेले टेकडी गणेश मंदिर हे विदर्भासह मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमधील भाविकांचे प्रमुख श्रद्धास्थान आहे.
या मंदिरातील गणपतींची मूर्ती स्वयंभू असून उजव्या सोंडेची व उत्तराभिमुख असल्याने ती अत्यंत दुर्मीळ मानली जाते. मूर्तीच्या मागे असलेले शिवलिंग हे मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. काळानुसार मंदिराचा विस्तार होत गेला असून आज ते नागपूरमधील एक महत्त्वाचे धार्मिक केंद्र बनले आहे.
भाविकांच्या विश्वासानुसार, टेकडी गणपती मनोकामना पूर्ण करणारे आणि संकटांपासून रक्षण करणारे दैवत आहे. त्यामुळे गणेश जयंती, चतुर्थी आणि इतर शुभदिनी येथे भाविकांची मोठी गर्दी होते. नियमितपणे दररोज सुमारे पाच हजार भाविक दर्शन घेतात, तर चतुर्थीच्या दिवशी ही संख्या दहा हजारांच्या पुढे जाते.
मंदिरात दिवसातून तीन वेळा आरती केली जाते आणि प्रत्येक आरतीनंतर भाविकांना मोदकांचा प्रसाद दिला जातो. गणेश जयंतीनिमित्त ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने संपूर्ण टेकडी परिसर दुमदुमून गेला असून, नागपूर शहर भक्तिरसात न्हाल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे.