Image Source:(Internet)
हैदराबाद:
तेलंगणामधील भटक्या प्राण्यांवरील अत्याचाराचा आणखी एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी राज्यातील तीन जिल्ह्यांत ५०० हून अधिक भटक्या कुत्र्यांना (Stray dogs) ठार मारल्याच्या घटनेनंतर आता हैदराबादच्या रंगारेड्डी जिल्ह्यातील याचराम गावात १०० हून अधिक भटक्या कुत्र्यांना विष देऊन ठार मारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना १९ जानेवारी रोजी घडली असून, मृत कुत्र्यांना गावाबाहेर पुरण्यात आल्याची माहिती आहे.
तेलंगणा पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, ही कुत्री व्यावसायिकांच्या मदतीने ठार मारण्यात आल्याचा संशय आहे. गावाच्या सरपंच आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या सांगण्यावरून ही कारवाई करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी सरपंच, एक वॉर्ड सदस्य आणि एक पंचायत सचिव यांना अटक केली आहे.
विषाचे इंजेक्शन देऊन हत्या-
प्राणी हक्क कार्यकर्त्यांच्या माहितीनुसार, सुरुवातीला कुत्र्यांना भूल देण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. मात्र पुढील तपासात असे स्पष्ट झाले की, कुत्र्यांना विषाचे इंजेक्शन देण्यात आले, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. काही दिवसांपासून गावातून भटके कुत्रे अचानक गायब होत असल्याने संशय अधिक गडद झाला होता.
प्राणी कल्याण कार्यकर्त्यांचा संताप-
या घटनेनंतर प्राणी कल्याण कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. स्ट्रे अॅनिमल्स फाउंडेशन ऑफ इंडियाच्या मुदावत प्रीती यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, गावातील कुत्रे सातत्याने गायब होत असल्याने काहीतरी गंभीर प्रकार घडत असल्याचा संशय आधीपासूनच होता.
पोलिसांनी आरोपींविरोधात प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा (PCA Act) अंतर्गत कलम 3(5) आणि 11(1)(a)(i) नुसार गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.या अमानुष घटनेमुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.