Image Source:(Internet)
मुंबई:
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने मुंबई महानगरपालिकेतील गटनेतेपदाची जबाबदारी माजी महापौर आणि नगरसेविका किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्याकडे सोपवली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, आगामी महापालिकेतील राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
मुंबई महापालिकेच्या 2026 च्या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 199 मधून किशोरी पेडणेकर यांनी शिवसेना शिंदे गटाच्या रुपल कुसळे यांचा पराभव करत विजय मिळवला होता. त्यांच्या अनुभव, आक्रमक भूमिका आणि संघटनात्मक पकड लक्षात घेता त्यांची गटनेतेपदी निवड करण्यात आल्याचे पक्षातील सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
गटनेतेपदासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून विशाखा राऊत, मिलिंद वैद्य, श्रद्धा जाधव यांचीही नावे चर्चेत होती. मात्र, बैठकीअंती किशोरी पेडणेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
दरम्यान, देशातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महानगरपालिकेत तब्बल २५ वर्षांनंतर ठाकरेंची एकहाती सत्ता संपुष्टात आली. 2026 च्या निवडणुकीत भाजप युतीने जोरदार मुसंडी मारत सत्ता हस्तगत केली आहे. ८९ जागांसह भाजप मुंबईतील सर्वात मोठा पक्ष ठरला, तर उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेला ६५ जागा मिळाल्या आहेत.
मुंबई महापालिका अंतिम निकाल – 2026
भाजप: 89
शिवसेना (उद्धव ठाकरे गट): 65
शिवसेना (शिंदे गट): 29
काँग्रेस: 24
एमआयएम: 8
मनसे: 6
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट): 3
समाजवादी पार्टी: 2
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट): 1
एकूण जागा: 227
दरम्यान, राज्यातील सर्व 29 महानगरपालिकांसाठी महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत 22 जानेवारी रोजी काढण्यात येणार आहे. सकाळी 11 वाजता मंत्रालयात नगरविकास विभागाच्या वतीने ही सोडत होणार असून, कोणत्या महानगरपालिकेत कोणत्या प्रवर्गाचा महापौर बसणार हे त्या दिवशी स्पष्ट होणार आहे.मुंबई महापालिकेतील महापौरपदावर कोणाचा दावा मजबूत होतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.