Image Source:(Internet)
मुंबई:
देशभरातील विविध राज्यांचे मुख्यमंत्री सध्या स्वित्झर्लंडमधील दावोस येथे सुरू असलेल्या औद्योगिक परिषदेत सहभागी झाले आहेत. मात्र या दौऱ्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते व खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी तीव्र आणि खोचक शब्दांत टीका केली आहे.
माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, “देशातील मुख्यमंत्र्यांची पिकनिक सध्या दावोसमध्ये सुरू आहे. ही पिकनिक संपल्यानंतरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महापौर निवडणुकीकडे लक्ष देतील,” असा टोला त्यांनी लगावला.
राऊत यांनी दावोस येथील औद्योगिक परिषद अत्यंत हास्यास्पद असल्याचे सांगत टीका अधिक तीव्र केली. “अनेक राज्यांचे मुख्यमंत्री देशात एकमेकांना भेटत नाहीत, पण थेट दावोसला भेटतात. विशेष म्हणजे भारतातल्या कंपन्यांनाच दावोसला बोलावून, तिथे करार केले जात आहेत. हे सगळं जनतेच्या कराच्या पैशातून होत आहे,” असा आरोप त्यांनी केला.
यावेळी संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असे आवाहनही केले. “देशातच उद्योग, गुंतवणूक आणि रोजगारासंबंधी निर्णय घेता येऊ शकतात, मग परदेशात जाऊन अशा पद्धतीने खर्च का केला जातो, याचा विचार व्हायला हवा,” असेही त्यांनी नमूद केले.या टीकेमुळे दावोस दौऱ्याबाबत पुन्हा एकदा राजकीय वाद रंगण्याची शक्यता आहे.