‘नितिन नबीन माझेही बॉस’; पंतप्रधान मोदींकडून नव्या राष्ट्रीय अध्यक्षांचे अभिनंदन

20 Jan 2026 14:53:23
 
PM Modi
 Image Source:(Internet)
नवी दिल्ली :
भारतीय जनता पार्टीचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नितिन नबीन (Nitin Nabin) यांची निवड झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन करत भावनिक आणि महत्त्वपूर्ण भाष्य केले. दिल्लीतील भाजपा मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, मी स्वतःला आजही भाजपाचा एक सामान्य कार्यकर्ता मानतो आणि नितिन नबीन हे आता आपले सर्वांचे अध्यक्ष आहेत, म्हणजेच ते माझेही बॉस आहेत. हे माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे, असे त्यांनी सांगितले.
 
पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले की, नितिन नबीन यांच्यावर केवळ भाजपाचे नेतृत्व करण्याचीच नव्हे, तर एनडीएतील सर्व घटक पक्षांमध्ये समन्वय राखण्याचीही मोठी जबाबदारी आहे. पुढील २५ वर्षांचा काळ देशाच्या दृष्टीने अत्यंत निर्णायक असून, याच कालखंडात विकसित भारताचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवायचे आहे. या महत्त्वाच्या टप्प्याच्या सुरुवातीलाच नितिन नबीन भाजपाची परंपरा आणि विचारधारा पुढे नेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 
नितिन नबीन यांच्या कार्यशैलीबद्दल बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, त्यांच्या संपर्कात येणारा प्रत्येक व्यक्ती त्यांच्या साधेपणा, सहजता आणि कार्यक्षमतेचे कौतुक करतो. भाजप युवा मोर्चातील जबाबदारी, विविध राज्यांतील प्रभारी पदाची भूमिका तसेच बिहार सरकारमधील अनुभव या सर्व ठिकाणी त्यांनी आपली क्षमता सिद्ध केली आहे, असे मोदी म्हणाले.
 
राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेवर भाष्य करताना पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, मागील अनेक महिन्यांपासून ‘संगठन पर्व’ अंतर्गत ही प्रक्रिया पूर्णपणे लोकशाही पद्धतीने आणि पक्षाच्या संविधानानुसार राबवली जात होती. आज या प्रक्रियेचा विधीपूर्वक समारोप झाला असून, हा संपूर्ण प्रवास भाजपाच्या लोकशाही आस्थेचे, संघटनात्मक शिस्तीचे आणि कार्यकर्ता-केंद्रित विचारसरणीचे प्रतीक आहे.
 
अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांचा उल्लेख करत पंतप्रधान मोदी म्हणाले की, त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने शून्यापासून शिखरापर्यंतचा ऐतिहासिक प्रवास केला. पुढे वेंकैया नायडू, नितिन गडकरी यांसारख्या नेत्यांनी संघटन मजबूत केले. राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखाली भाजपाला प्रथमच स्वबळावर पूर्ण बहुमत मिळाले, तर अमित शाह यांच्या काळात देशातील अनेक राज्यांत भाजपाची सरकारे स्थापन झाली. जे. पी. नड्डा यांच्या नेतृत्वात पंचायत ते संसदपर्यंत पक्ष अधिक बळकट झाला आणि केंद्रात सलग तिसऱ्यांदा भाजपाचे सरकार सत्तेत आले.
 
नितिन नबीन यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचा प्रवास अधिक गतिमान आणि सशक्त होईल, असा विश्वास व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.
Powered By Sangraha 9.0