Image Source:(Internet)
नवी दिल्ली :
भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात आज मोठा बदल पाहायला मिळाला आहे. पक्षाने नितीन नबीन (Nitin Nabin) यांना राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी बिनविरोध निवडून, नव्या युगाची सुरूवात केली आहे. दिल्लीच्या भाजप मुख्यालयात झालेल्या अधिकृत कार्यक्रमात त्यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली.
या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी आणि माजी अध्यक्ष जे.पी. नड्डा उपस्थित होते. भाजपाचे निवडणूक अधिकारी के. लक्ष्मण यांनी सांगितले की, अध्यक्षपदासाठी आलेल्या ३७ अर्जांपैकी नितीन नबीन यांचा अर्ज एकटाच शिल्लक राहिल्यामुळे त्यांची निवड एकमताने झाली.
माजी अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी यावेळी सांगितले, “पक्षासाठी हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय आणि संघटनात्मक कामात अनुभवी नेतृत्वाला पक्षाची जबाबदारी देण्यात आली आहे. नितीन नबीन यांच्या नेतृत्वात भाजप अधिक प्रगती करेल.”
राजकारणात त्यांनी बिहारमध्ये पाच वेळा आमदारपदाचा मान मिळवला असून, विविध मंत्रीपदे सांभाळले आहेत. युवा मोर्चाचे राष्ट्रीय महासचिव म्हणूनही त्यांनी संघटनात्मक दृष्टीकोनातून महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सिक्कीम आणि छत्तीसगडच्या प्रभारी म्हणून देखील त्यांचा अनुभव पक्षासाठी मोठा बल बनला आहे.
भाजपच्या इतिहासात अनेक दिग्गज नेत्यांनी अध्यक्षपद सांभाळले आहे, पण नितीन नबीन हे पक्षाचे सर्वात तरुण अध्यक्ष ठरले आहेत. पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे.