पुण्यात सायकल शर्यतीदरम्यान भीषण अपघात; ७० हून अधिक सायकलस्वार जखमी

20 Jan 2026 19:31:08
 
Horrific accident
 Image Source:(Internet)
पुणे
पुणे (Pune) ग्रँड चॅलेंज सायकल टूरदरम्यान मुळशी–कोळवण मार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात ७० पेक्षा अधिक सायकलस्वार एकमेकांवर आदळले, तर अनेकजण रस्त्याबाहेर फेकले गेले. या घटनेमुळे जिल्हा प्रशासनाच्या नियोजनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
 
कोळवणजवळ रस्ता अचानक अरुंद होत असल्याने हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे. सायकलस्वार ६० ते ७० किमी प्रतितास वेगाने सायकल चालवत असताना पुढे असलेला तीव्र वळण दिसून न आल्याने एक सायकलस्वाराचा तोल गेला. मागून येणाऱ्या सायकलस्वारांना थांबण्यास वेळ न मिळाल्याने क्षणातच एकामागोमाग एक सायकलस्वार कोसळले.
 
या अपघातात अनेक सायकलस्वार रस्त्याबाहेर फेकले गेले. अनेकांना हातापायांना गंभीर जखमा, फ्रॅक्चर तसेच डोक्याला मार बसला आहे. घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका व स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतकार्य सुरू केले. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
 
सायकलस्वारांच्या म्हणण्यानुसार, त्या ठिकाणी रस्ता अरुंद असल्याची किंवा तीव्र वळण असल्याची कोणतीही सूचना फलक लावण्यात आले नव्हते. तसेच सुरक्षेसाठी आवश्यक कर्मचारीही अपुरे होते. त्यामुळे या अपघातास अपुरे नियोजन आणि निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा आरोप केला जात आहे.
 
आरोग्य व क्रीडाप्रेम वाढावा या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शर्यतीवर या घटनेमुळे सावली पडली असून, खेळाडूंमध्ये तीव्र संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भविष्यात अशा स्पर्धांसाठी कडक सुरक्षा नियम, मार्गाची पूर्वतपासणी आणि योग्य नियोजन करण्याची मागणी होत आहे.
 
दरम्यान, प्रशासनाने या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले असून, भविष्यात अशा प्रकारचे अपघात टाळण्यासाठी सुरक्षेच्या उपाययोजना अधिक कडक केल्या जातील, असे सांगण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0