माजी खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांकडून कसून तपास

20 Jan 2026 16:10:33
 
Navneet Rana
 Image Source:(Internet)
अमरावती :
अमरावतीत राजकीय वातावरण ढवळून काढणारी घटना घडली आहे. माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून, हा फोन थेट पोलिस कंट्रोल रूमवर आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी एका अनोळखी व्यक्तीने कंट्रोल रूमवर संपर्क साधत नवनीत राणा यांना ठार मारण्याची धमकी दिली. कॉलचे स्वरूप गंभीर असल्याने पोलिसांनी कोणताही विलंब न करता आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया राबवली आहे.
 
या प्रकरणी राजापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. धमकी देणारा व्यक्ती कोण आहे, त्याने फोन कुठून केला आणि धमकीमागील नेमका हेतू काय, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तांत्रिक तपास सुरू आहे. कॉल डिटेल्स, लोकेशन ट्रॅकिंग आणि इतर पुराव्यांच्या आधारे आरोपीपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
 
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी हालचाली वाढवत नवनीत राणा यांच्या सुरक्षेचा आढावा घेतला आहे. त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून, कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी खबरदारीचे उपाय राबवण्यात येत आहेत.
 
प्राथमिक तपासात ही धमकी अलीकडील राजकीय वक्तव्यांशी संबंधित असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, आरोपीचा शोध लागल्यानंतरच संपूर्ण प्रकरण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. सध्या या प्रकरणाचा तपास गांभीर्याने सुरू असून शहरातील राजकीय वातावरणात तणाव निर्माण झाला आहे.
Powered By Sangraha 9.0