Image Source:(Internet)
मुंबई :
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि त्यांची पत्नी ट्विंकल खन्ना यांच्याशी संबंधित मोठी बातमी समोर आली आहे. जुहू परिसरात त्यांच्या ताफ्यातील एका कारला भीषण रस्ते अपघात झाला. हा अपघात ते दोघे परदेशातून आपल्या २५व्या लग्नाच्या वाढदिवसानंतर मुंबईत परतत असताना झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, जुहू येथील सिल्व्हर बीच कॅफेजवळ हा अपघात घडला. एका भरधाव मर्सिडीज कारने प्रथम एका ऑटो रिक्षाला धडक दिली. धडकेचा जोर इतका प्रचंड होता की ऑटो उडत जाऊन अक्षय कुमार यांच्या ताफ्यातील कारवर आदळला, त्यामुळे काही वाहनं एकमेकांत अडकली. अपघाताच्या वेळी अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना विमानतळावरून जुहू येथील निवासस्थानी जात होते.
सुदैवाने या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही, अशी प्राथमिक माहिती आहे. मात्र ऑटो रिक्षाचे मोठे नुकसान झाले. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत करत जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल केले.
अपघातानंतर काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आणि वाहतूकही विस्कळीत झाली. पोलिसांनी परिस्थितीवर त्वरीत नियंत्रण मिळवत रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. अपघाताची बातमी समजताच चाहत्यांमध्ये चिंता पसरली होती; मात्र कोणतीही जीवितहानी न झाल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.