Image Source:(Internet)
मुंबई :
मराठी कलाविश्वात सध्या मंगलघटिका सुरू असून, या आनंदी यादीत आणखी एका घरात सनईचा सूर घुमू लागला आहे. अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) यांच्या घरात कौटुंबिक आनंदाचा क्षण साजरा झाला असून, त्यांचा मोठा लेक सार्थक ओक याचा साखरपुडा थाटात पार पडला आहे.
सार्थकने आपल्या आयुष्याच्या नव्या पर्वाची सुरुवात रितू हिच्यासोबत केली. साखरपुड्याच्या सोहळ्यात साधेपणा आणि आपुलकी यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला. नवदांपत्याने खास लूकमध्ये उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले, तर प्रसाद ओक आणि मंजिरी ओक यांच्या चेहऱ्यावरचा अभिमान आणि आनंद फोटोंमधून स्पष्ट दिसत होता.
या कौटुंबिक सोहळ्याला कलाविश्वाचीही खास उपस्थिती लाभली. अभिनेत्री अमृता खानविलकर हिने साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत शुभेच्छा दिल्या. अभिनेता स्वप्निल जोशी यांच्यासह अनेक कलाकारांनी या आनंदात सहभाग घेतला.
उल्लेखनीय बाब म्हणजे, सार्थकने जर्मनीतून उच्च शिक्षण पूर्ण केले असून, शैक्षणिक प्रवासानंतर तो आता वैयक्तिक आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यावर उभा आहे. लवकरच तो बोहल्यावर चढणार असून, प्रसाद आणि मंजिरी ओक यांच्या आयुष्यातही सासू-सासरे ही नवी ओळख जोडली जाणार आहे.
ओक कुटुंबातील हा आनंदोत्सव सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असून, चाहत्यांकडून आणि सहकाऱ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.