Image Source:(Internet)
नागपूर :
राजकारणात संधी मिळवण्यासाठीची धावपळ, अंतर्गत स्पर्धा आणि सत्तेभोवती फिरणारी अस्वस्थता या सगळ्यांवर स्वतःहून पूर्णविराम देत विधान परिषदेचे आमदार संदीप जोशी (Sandeep Joshi) यांनी सक्रिय राजकारणातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय कोणत्याही राजकीय दबावातून नाही, तर दीर्घ आत्मपरीक्षणातून घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
आपण ५५ वर्षांचे झालो असून, आता नव्या नेतृत्वाला संधी देण्यासाठी स्वतःची भूमिका मर्यादित करणे आवश्यक असल्याची भूमिका त्यांनी घेतली. “राजकारण हे पदासाठी नव्हे, तर समाजासाठी असते,” या भूमिकेतून त्यांनी पुढील वाटचाल सामाजिक कार्यापुरती सीमित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
आ. संदीप जोशी यांची विधान परिषदेची मुदत १३ मे रोजी संपत असून, त्या तारखेपर्यंत आमदार म्हणून असलेली सर्व कर्तव्ये ते पूर्ण निष्ठेने पार पाडणार आहेत. मात्र त्यानंतर आमदारकी न स्वीकारता पूर्णतः सक्रिय राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. पक्षाने संधी दिली तरी ती नाकारून एखाद्या तरुण कार्यकर्त्याला ती द्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पक्षाने दिलेल्या संधींबाबत त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले असून, भाजपने सामान्य कार्यकर्त्याला मोठ्या जबाबदाऱ्या दिल्याचा अनुभव आयुष्यभर ऋणी ठेवणारा असल्याचे सांगितले.
राजकारणातून माघार घेत असली तरी सामाजिक जबाबदाऱ्यांपासून दूर जाणार नसल्याचे जोशी यांनी स्पष्ट केले. कोरोना काळात सुरू केलेला ‘सोबत पालकत्व प्रकल्प’, रुग्णांच्या नातेवाईकांसाठीचा ‘दीनदयाल थाळी प्रकल्प’, गोसेवा, आरोग्य सेवा तसेच क्रीडा क्षेत्रातील विविध संघटनांमधील भूमिका ते पुढेही निभावणार आहेत.
चार वेळा नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, महापौर आणि विधान परिषदेचे सदस्य असा प्रदीर्घ प्रवास केलेल्या आ. संदीप जोशी यांच्या या निर्णयाकडे केवळ निवृत्ती म्हणून न पाहता, राजकारणातील मूल्यांवर भाष्य करणारा निर्णय म्हणून पाहिले जात आहे.
नागपूरच्या राजकीय वर्तुळात या निर्णयाची चर्चा सुरू असून, “कुर्सीपेक्षा किंमत महत्त्वाची” या भूमिकेचा हा ठळक संदेश असल्याचे मानले जात आहे.