दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला सीबीआयची नोटीस; करूर चेंगराचेंगरी प्रकरणात पुन्हा चौकशी

19 Jan 2026 20:07:40
 
superstar Vijay
 Image Source:(Internet)
चेन्नई/नवी दिल्ली :
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार विजय (Vijay) यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत. करूर येथील चेंगराचेंगरी प्रकरणाच्या चौकशीअंतर्गत केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) अभिनेता विजय यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहेत. यामुळे राजकीय आणि चित्रपट वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे.
 
टीव्हीके पक्षाचे प्रमुख आणि लोकप्रिय अभिनेते जोसेफ विजय चंद्रशेखर, उर्फ विजय, यांना या प्रकरणी १९ जानेवारी रोजी नवी दिल्लीत हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. याआधी १२ जानेवारी रोजी सीबीआयने विजय यांची सलग सुमारे सहा तास चौकशी केली होती. मात्र तपास अधिक सखोल करण्यासाठी पुन्हा चौकशीची गरज असल्याचे तपास यंत्रणेचे म्हणणे आहे.
 
मीडिया अहवालांनुसार, चौकशीदरम्यान विजय यांनी करूर चेंगराचेंगरीसाठी स्वतः किंवा त्यांच्या पक्षाची कोणतीही जबाबदारी नसल्याचे स्पष्ट केले आहे. गर्दी नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात येताच आपण तात्काळ भाषण थांबवले आणि पुढील अनर्थ टाळण्यासाठी स्टेजवरून खाली उतरलो, असा दावा त्यांनी केला आहे.
 
मात्र, पोलिसांनी दिलेल्या जबाबात अभिनेता विजय आणि त्यांच्या पक्षालाच या चेंगराचेंगरीसाठी जबाबदार धरले आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, विजय कार्यक्रमस्थळी उशिरा पोहोचल्याने प्रचंड गर्दी जमली. त्यांनी भाषण सुरू करताच चाहते जवळून पाहण्यासाठी पुढे सरसावले आणि त्याच वेळी चेंगराचेंगरीस सुरुवात झाली.
 
सीबीआय सध्या विजय यांच्या म्हणण्यासह पोलिसांच्या जबाबांचीही बारकाईने तपासणी करत आहे. या प्रकरणात नेमकी चूक कोणाची आहे, हे ठरवण्यासाठी दोन्ही बाजूंच्या साक्षी आणि पुरावे तपासले जात आहेत. दरम्यान, विजयचे चाहते या घडामोडींमुळे चिंतेत असून, पुढील चौकशीत कोणते नवे तथ्य समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Powered By Sangraha 9.0