एकनाथ शिंदेंची प्रकृती अस्वस्थ; महापालिका निवडणुकीतील धावपळीमुळे कार्यक्रम राखीव

17 Jan 2026 16:18:23
 
Eknath Shinde
 Image Source:(Internet)
मुंबई :
महापालिका निवडणुकीत जास्त धावपळ आणि सभांच्या सलग कार्यक्रमांमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची (Eknath Shinde) प्रकृती अस्वस्थ झाली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना पूर्ण विश्रांती घ्यावी लागल्यामुळे शिंदेंनी शनिवारी त्यांच्या दिवसभरातील सर्व कार्यक्रम राखीव ठेवले आहेत.
 
तब्येतीच्या कारणास्तव एकनाथ शिंदे आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतही उपस्थित राहू शकले नाहीत. याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना पूर्वसूचना दिलेली होती. गेल्या महिनाभरात राज्यभरातील प्रमुख महापालिकांमध्ये शिंदेंनी सक्रिय सभा घेतल्या, ज्यामुळे त्यांची तब्येत बिघडल्याचे समजते.
 
यावेळी, उपमुख्यमंत्री अजित पवार देखील बारामतीतील कृषी प्रदर्शन कार्यक्रमामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीला अनुपस्थित होते.
शिंदेंच्या नगरसेवकांसाठी खास योजना
 
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेने एकूण ९० जागांवर उमेदवारी दिली, त्यापैकी २९ जागांवर विजय मिळवला आहे. निवडणुकीनंतर उपमुख्यमंत्री शिंदेंनी विजयी नगरसेवकांसाठी एक खास योजना आखली असून, सर्व नगरसेवकांना एका फाईव्ह-स्टार हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. या ठिकाणी ते सत्तास्थापनेपर्यंत मुक्कामी राहणार आहेत.
 
ठाण्यात भाजपची ताकद-
ठाण्यात भाजपने ३९ जागांवर लढत दिली होती, त्यापैकी २८ नगरसेवक विजयी झाले. यावरून भाजपचा स्ट्राईक रेट सर्वाधिक असल्याचे नेतृत्त्वाकडून सांगितले जात आहे. भाजप आमदार संजय केळकर यांनी ठाण्यात अधिक जागा लढवल्या असत्या तर निकाल अजूनही प्रभावी असता, अशी मतं व्यक्त केली. निरंजन डावखरे यांनीही भाजपच्या विजयानं ठाण्यातील ताकद अधोरेखित केली आहे.
 
सदर निवडणुकीनंतर राजकीय चित्रात महत्त्वपूर्ण बदल आणि उपमुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींचा पुढील काळात राज्याच्या राजकारणावर कसा परिणाम होतो याकडे लक्ष लागले आहे.
Powered By Sangraha 9.0