Image Source:(Internet)
मुंबई :
मुंबईत पार पडलेल्या मतदान प्रक्रियेवर शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. मुंबईसारख्या मोठ्या शहरात मतदानाच्या दिवशी घडलेले प्रकार लोकशाहीसाठी धोकादायक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
राऊत यांच्या म्हणण्यानुसार, शिवसेना (UBT), मनसे तसेच काँग्रेस विचारसरणीच्या भागांमधील हजारो मतदारांची नावे अचानक मतदारयादीतून गायब झाली आहेत. विशेष म्हणजे या मतदारांनी मागील विधानसभा निवडणुकीत मतदान केले होते. असे असताना त्यांची नावे यादीत नसणे ही गंभीर बाब असून यामागे कोणाचा हस्तक्षेप आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
याशिवाय अनेक मतदान केंद्रांवर ईव्हीएम यंत्रणांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याच्या तक्रारी समोर आल्याचे राऊत यांनी सांगितले. या तक्रारी वारंवार करूनही निवडणूक आयोग दखल घेत नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
आचारसंहिता अद्याप लागू असताना भाजपचे वरिष्ठ नेते आणि निवडणूक आयोगातील अधिकाऱ्यांमध्ये बैठक का झाली, याचे स्पष्टीकरण आयोगाने द्यावे, अशी मागणी करत राऊत यांनी आयोगाच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
दरम्यान, संपूर्ण मतदान प्रक्रियेची सखोल चौकशी करण्यात यावी आणि मतदारांचा अधिकार डावलला जाणार नाही, याची खात्री निवडणूक आयोगाने द्यावी, अशी मागणी शिवसेना (ठाकरे गट)कडून करण्यात आली आहे.