Image Source:(Internet)
मुंबई :
राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणूक निकालांना आजपासून सुरुवात झाली असून, संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या मुंबई (Mumbai) महानगरपालिका निवडणुकीतील सुरुवातीचे कल समोर येऊ लागले आहेत. मुंबईत भाजप आणि शिवसेनेला चांगले यश मिळताना दिसत असून, ठाकरे बंधूंच्या नेतृत्वाखालील गटाकडून भाजपला कडवी टक्कर मिळत असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, मुंबईतील प्रभाग क्रमांक २ मधून भाजपाच्या उमेदवार तेजस्वी घोसाळकर यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. निवडणुकीच्या तोंडावर भाजपात प्रवेश केलेल्या तेजस्वी घोसाळकर यापूर्वी शिवसेना (ठाकरे गट) मध्ये सक्रिय होत्या. मात्र पक्षांतरानंतर पहिल्याच निवडणुकीत त्यांनी मतदारांचा विश्वास संपादन करत शानदार कामगिरी केली आहे.
या लढतीत तेजस्वी घोसाळकर यांना १६,४८४ मते मिळाली, तर त्यांच्या विरोधी उमेदवार धनश्री कोळगे यांना ५,७५९ मतांवर समाधान मानावे लागले. मोठ्या मताधिक्याने मिळालेल्या या विजयामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, मुंबई महापालिका निवडणुकीत हा निकाल महत्त्वाचा मानला जात आहे.