Image Source:(Internet)
मुंबई :
मुंबई (Mumbai) महापालिकेच्या निवडणूक निकालांनंतर शहराच्या राजकारणात ऐतिहासिक घडामोड घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबईच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाचा ‘मराठी’ महापौर होणार असल्याचा ठाम दावा भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे.
एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना उपाध्ये म्हणाले, “मुंबईत भाजपाचा मराठी महापौर होणार याबाबत कुणीही शंका बाळगण्याचे कारण नाही. ज्या पद्धतीने महापालिका निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत, त्यावरून हे स्पष्टपणे दिसून येते की मुंबईत भारतीय जनता पक्षाचाच महापौर असेल.”
ते पुढे म्हणाले की, भाजपाने गेल्या अनेक वर्षांत मुंबईत सातत्याने मेहनत घेतली आहे. “गेल्या ४० वर्षांपूर्वी आम्ही एक छोटा भाऊ म्हणून राजकारणात सुरुवात केली. आज मात्र भाजप मुंबईत सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. पक्ष १०० च्या पुढे जाण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे, ही कार्यकर्त्यांच्या परिश्रमांची पावती आहे,” असे उपाध्ये यांनी सांगितले.
महायुतीत महापौरपदाबाबत चर्चा होणार असली, तरी भाजपाचा महापौर हे कार्यकर्त्यांचे दीर्घकाळाचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरण्याच्या मार्गावर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “मुंबईत भाजपाचा महापौर हे आमचे वर्षानुवर्षांचे स्वप्न होते. ते स्वप्न पूर्ण होण्यासाठी आता फारसा काळ उरलेला नाही,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या वक्तव्यानंतर मुंबईच्या राजकीय वर्तुळात चर्चांना वेग आला असून, आगामी काळात महापालिकेच्या सत्तास्थापनेवर सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.