Image Source:(Internet)
जळगाव :
महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानापूर्वी शहरातील एका मतदान केंद्रावर काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. महानगरपालिका उर्दू शाळा क्रमांक १५ येथील मतदान केंद्रावर ईव्हीएम (EVM) मशीनची मांडणी ठरलेल्या नियमांनुसार नसल्याचा दावा उमेदवार प्रतिनिधींनी केला.
ईव्हीएम मशीनचा क्रम चुकीचा असल्याने मतदान प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचे सांगत प्रतिनिधींनी तात्काळ दुरुस्तीची मागणी केली. या कारणावरून निवडणूक कर्मचारी आणि उमेदवार प्रतिनिधी यांच्यात शाब्दिक वाद झाला, त्यामुळे काही काळ मतदान प्रक्रिया खोळंबली.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत निवडणूक अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केला. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर ईव्हीएम मशीनची मांडणी पुन्हा नियमांनुसार करण्यात आली. यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली आणि मतदान सुरळीतपणे सुरू झाले.
दरम्यान, पोलिंग एजंटसाठी बसण्याची योग्य व्यवस्था नसल्याबाबतही नाराजी व्यक्त करण्यात आली. आवश्यक बदल केल्यानंतर मतदान केंद्रावरील वातावरण शांत झाले. या घटनेमुळे मतदानाच्या व्यवस्थेबाबत प्रशासनाच्या तयारीवर चर्चा रंगली आहे.