नागपुरात राजकीय वातावरण तापलं; काँग्रेस उमेदवाराचं कार्यालय जळालं, भाजपवर आरोप

15 Jan 2026 18:56:30
 
Congress
 Image Source:(Internet)
नागपूर :
राज्यभरात महापालिका निवडणुकांसाठी मतदानाचा उत्साह शिगेला असतानाच नागपुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३१ मध्ये काँग्रेस (Congress) उमेदवार शिवानी चौधरी यांच्या कार्यालयाला आग लागल्याची घटना घडली असून, त्यामुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
 
या घटनेत काँग्रेस उमेदवाराच्या कार्यालयाबाहेरील पेंडोल, पडदे आणि पक्षाचे झेंडे पूर्णपणे जळून खाक झाले आहेत. कार्यालयाला आग नेमकी कशी लागली, की ती लावण्यात आली, याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी पोलिसांकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.
 
दरम्यान, या घटनेनंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. भाजप कार्यकर्त्यांनीच कार्यालयाबाहेरील पेंडोल, पडदे आणि पक्षाचे झेंडे जाळले असावेत, असा आरोप काँग्रेसकडून करण्यात येत आहे. मतदान सुरू असतानाच अशा प्रकारची घटना घडल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना भाजप आमदार प्रवीण दटके यांनी काँग्रेसवरच संशय व्यक्त केला आहे. ते म्हणाले, “सध्या सर्वत्र मतदानाची रणधुमाळी सुरू आहे. अशा परिस्थितीत कार्यालय जळाल्याची घटना समोर आली आहे. काँग्रेसचे कार्यालय जळाले की काँग्रेस कार्यकर्त्यांनीच स्वतः जाळले, याबाबत आमच्या मनात शंका आहे. या संपूर्ण प्रकरणाची पोलिसांनी सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करावी.”
 
यावेळी दटके यांनी आणखी एक आरोप करत सांगितले की, “प्रभाग क्रमांक ११ मध्ये काल रात्री भाजप उमेदवार भूषण शिंगणे यांना सुमारे शंभर काँग्रेस कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. उमेदवारांवर हल्ला करणे आणि हिंसेचा मार्ग स्वीकारणे ही काँग्रेसचीच संस्कृती असल्याचा आरोपही त्यांनी केला.”
 
एकीकडे राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान सुरू असून नागरिक मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क बजावत आहेत. लोकशाहीचा उत्सव सुरू असतानाच नागपुरातील या घटनेमुळे राजकीय वातावरण अधिकच तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांच्या चौकशीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Powered By Sangraha 9.0