नागपूर मनपा निवडणूक: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहपरिवार बजावला मतदानाचा हक्क

15 Jan 2026 14:49:31
 
CM Devendra Fadnavis
 Image Source:(Internet)
नागपूर :
राज्यात आज महानगरपालिका निवडणुकांसाठी (Elections) मतदानाला सुरुवात झाली असून, लोकशाहीच्या या प्रक्रियेत नागरिकांसह राजकीय नेतेही सक्रिय सहभाग घेत आहेत. सकाळपासूनच अनेक मतदान केंद्रांवर मतदारांची उपस्थिती दिसून येत असून, निवडणुकीचे वातावरण उत्साही झाले आहे.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला. पत्नी अमृता फडणवीस आणि मातोश्री यांच्यासोबत त्यांनी धरमपेठ भागातील झोन क्रमांक २, प्रभाग क्रमांक १५ मधील आदर्श महिला मतदान केंद्रावर मतदान केले. यावेळी मतदान केंद्र परिसरात नागरिक आणि कार्यकर्त्यांचीही उपस्थिती होती.
 
विशेष सवलत किंवा प्रोटोकॉल न घेता मुख्यमंत्री फडणवीस रांगेत उभे राहून मतदान करताना दिसले. मतदानानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन केले. “मतदान हे लोकशाहीचे बळ आहे. तो केवळ अधिकार नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
 
मतदानानंतर बोटावर शाईऐवजी मार्करचा वापर करण्यात येत असल्याबाबत विचारणा झाल्यावर त्यांनी सांगितले की, ही प्रक्रिया भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली राबवली जात असून यापूर्वीही अशा पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. याबाबत कोणाला शंका किंवा आक्षेप असल्यास निवडणूक आयोगाने त्याची दखल घ्यावी, असेही ते म्हणाले.
 
दरम्यान, विरोधकांवर सूचक टीका करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, काहीजण निकाल जाहीर होण्यापूर्वीच अंदाज व्यक्त करत असून, पराभवानंतर जबाबदारी कुणावर टाकायची याची तयारी सुरू आहे. सध्याच्या राजकीय चित्रातून हे स्पष्टपणे जाणवत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
Powered By Sangraha 9.0