Image Source:(Internet)
नागपूर :
राज्यातील बीएमसीसह महत्त्वाच्या महानगरपालिका निवडणुकांसाठी (Elections) गुरुवार, १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान प्रक्रिया सुरू आहे. मात्र, सकाळपासूनच विविध शहरांमध्ये तांत्रिक अडचणी समोर येत असल्याने या बहुचर्चित निवडणुकीवर गोंधळाचे सावट पसरले आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नवी मुंबईत अनेक मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याच्या तक्रारी मिळाल्या आहेत. काही ठिकाणी मशीन वेळेवर सुरू न होणे, मत नोंद झाल्याचा स्पष्ट संकेत न मिळणे, तर काही केंद्रांवर यंत्र बदलण्यात वेळ गेल्याने मतदानाची गती मंदावली. परिणामी मतदारांना रांगेत थांबावे लागल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
ईव्हीएमवरील संशय; रोहित पवारांचे आरोप-
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात ईव्हीएम बिघाडाचा मुद्दा चिघळला असून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यावर आक्रमक झाली आहे. आमदार रोहित पवार यांनी अनेक मतदान केंद्रांवर ईव्हीएमच्या वेळेमध्ये फरक असल्याचा दावा केला आहे. काही मशीनमध्ये बटण दाबल्यानंतर बीपचा आवाज येतो, मात्र लाईट न लागल्याने मत नोंदणीबाबत संभ्रम निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.
या तांत्रिक अडचणींमुळे मतदान प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित होत असून मतदारांचा विश्वास डळमळीत होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
मतदार यादीतील गोंधळ; गणेश नाईक संतप्त-
नवी मुंबईत मतदार याद्यांतील त्रुटी उघडकीस आल्या असून त्याचा फटका थेट भाजपचे ज्येष्ठ नेते व राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांना बसला आहे. नेहमी ज्या मतदान केंद्रावर मतदान करतात, त्या केंद्रावर त्यांचे नाव यादीत नसल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांना दुसऱ्या मतदान केंद्रावर जावे लागले.
धक्कादायक बाब म्हणजे, एकाच कुटुंबातील सदस्यांची नावे वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर नोंदवण्यात आल्याचेही समोर आले आहे. या प्रकारावर नाराजी व्यक्त करत “माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीचे नावच यादीत नसेल, तर सामान्य मतदारांची अवस्था काय असेल?” असा सवाल नाईक यांनी उपस्थित केला.
निवडणूक आयोगावर टीकेची झोड-
राज्यातील अनेक शहरांत मतदान सुरू असतानाच या तक्रारी समोर आल्याने विरोधकांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ईव्हीएम बिघाड आणि मतदार यादीतील त्रुटींमुळे मतदानाचा टक्का घटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या सर्व प्रकरणांवर निवडणूक आयोगाकडून अद्याप अधिकृत भूमिका जाहीर झालेली नसली, तरी या पार्श्वभूमीवर शुक्रवार, १६ जानेवारी रोजी होणारी मतमोजणी अत्यंत महत्त्वाची आणि चुरशीची ठरणार असल्याचे स्पष्ट आहे.