Image Source:(Internet)
पुणे:
राज्याच्या राजकारणात गेले काही दिवस सुरू असलेल्या चर्चांना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुण्यात स्पष्ट शब्दांत पूर्णविराम दिला. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार असल्याच्या अटकळी फेटाळून लावत, कोणतेही विलीनीकरण होणार नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. याचबरोबर खासदार सुप्रिया सुळे या केंद्र सरकारमध्ये मंत्री होणार नाहीत, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
पुण्यात पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येणार असल्याच्या चर्चा निराधार आहेत. सध्या अशा कोणत्याही हालचाली किंवा चर्चा सुरू नाहीत. विशेषतः पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात पसरवण्यात येणाऱ्या विलीनीकरणाच्या अफवांवर त्यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली.
सुप्रिया सुळे यांच्या केंद्रीय मंत्रिपदाबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, त्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि इंडिया आघाडीचा भाग आहेत. त्यामुळे विद्यमान राजकीय परिस्थितीत त्यांच्या केंद्रातील मंत्रिमंडळात समावेश होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. निवडणुकीनंतर परिस्थिती बदलेल का, या प्रश्नावर त्यांनी कोणतीही ठोस प्रतिक्रिया देणे टाळले.
यावेळी अजित पवार यांनी भाजपवरही जोरदार टीका केली. पूर्वी आपण ‘मैत्रीपूर्ण लढाई’ची भूमिका मांडली होती, मात्र सध्या आपल्यावर सातत्याने टीका केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. माझ्यावर वारंवार हल्ले होत असतील, तर ही लढाई मैत्रीपूर्ण कशी असू शकते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
पुण्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना अजित पवार म्हणाले की, काही नेत्यांना शहरातील सत्ता हातातून जाण्याची भीती वाटत आहे, त्यामुळेच अशा प्रकारची वक्तव्ये केली जात आहेत. मुख्यमंत्री पुण्यात येऊन महायुती कायम राहील असे सांगतात, तर दुसरीकडे काही लोकांकडून पोकळ आश्वासने दिली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
मुख्यमंत्र्यांच्या मतदानाबाबतच्या आवाहनावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले की, मतदारांनी सकाळी लवकर उठावे, अलार्म बंद करावा आणि मतदान केंद्रावर जाऊन घड्याळाच्या चिन्हासमोर मतदान करावे. त्यांनी थेट मतदारांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने मतदान करण्याचे आवाहन केले.
दरम्यान, मंगळवारी अजित पवार यांनी नर्हे–आंबेगाव परिसरातील विविध वॉर्डांमध्ये रोड शो आणि प्रचार रॅली काढल्या. या रॅलीदरम्यान त्यांनी भाजपवर कडाडून टीका करत राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. पुण्यातील राजकीय वातावरण या वक्तव्यांमुळे अधिक तापले असल्याचे चित्र दिसत आहे.