मुंबई महापौराच्या वादात नवा ट्विस्ट; फडणवीसांच्या हिंदुत्वावर उद्धव ठाकरेंचे प्रश्न

13 Jan 2026 18:22:20
 
Thackeray questions Fadnavis
 Image Source:(Internet)
मुंबई:
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेला “महापौर हिंदू की मराठी?” हा वाद दिवसेंदिवस अधिकच चिघळत चालला आहे. शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हिंदुत्वावर थेट शंका उपस्थित करत राजकीय वातावरण तापवले आहे.
 
भाजपकडून प्रचारात “मुंबईचा महापौर हिंदूच असणार” असा नारा दिला जात असताना, उद्धव ठाकरे यांनी त्याला प्रत्युत्तर देत “मुंबईचा महापौर मराठीच होईल” अशी ठाम भूमिका घेतली. याच मुद्द्यावरून त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली.
 
उद्धव ठाकरे म्हणाले, “मराठी महापौर म्हटलं की भाजपला त्यात हिंदू दिसत नाही. मी मराठीही आहे आणि हिंदूही आहे. पण देवेंद्र फडणवीस जर मराठी माणसालाच हिंदू मानत नसतील, तर हा नेमका कोणता हिंदुत्वाचा विचार आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
 
जन्मदाखल्याचा संदर्भ देत टीका-
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर आणखी आक्रमक भूमिका घेतली. “देवेंद्र फडणवीस स्वतः हिंदू आहेत की नाहीत, याबाबतच आता शंका वाटते. त्यांच्या आई-वडिलांचा धर्म काय होता, हे जन्मदाखल्यातून तपासण्याची वेळ आली आहे,” असे वादग्रस्त विधान त्यांनी केलं.
 
बाळासाहेब ठाकरे आणि शिवरायांचा उल्लेख-
यावेळी उद्धव ठाकरे यांनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा दाखला दिला. “बाळासाहेब ठाकरे हे अस्सल मराठी होते आणि कट्टर हिंदूही होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी संघर्ष केला, तो मराठी बाणा आणि हिंदुत्वासाठीच. पण फडणवीसांना जर मराठी माणसात हिंदू दिसत नसेल, तर ते या मातीतले पुत्र आहेत का?” असा घणाघात त्यांनी केला.
 
भाजपच्या आरोपांना प्रत्युत्तर-
शिवसेना मुस्लिम महापौर देणार असल्याचा आरोप भाजपकडून सातत्याने केला जात आहे. यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजप जाणीवपूर्वक समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. “आमच्यासाठी मराठी अस्मिता आणि हिंदुत्व वेगवेगळे नाहीत. पण भाजप फक्त मतांच्या ध्रुवीकरणासाठी हिंदू-मुस्लिम वाद पुढे आणत आहे,” असा आरोप त्यांनी केला.
 
महापौरपदावरून सुरू झालेला हा वाद आता थेट वैयक्तिक टीकेपर्यंत पोहोचल्याने, आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत हा मुद्दा अधिकच गाजण्याची शक्यता आहे.
Powered By Sangraha 9.0