Image Source:(Internet)
नागपूर :
महाराष्ट्रातील ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत (Ladki Bhaeen Yojana) संक्रांतीच्या आधी लाभार्थी महिलांना एकत्रित 3 हजार रुपये मिळण्याची शक्यता संपुष्टात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने आचारसंहिता काळात कोणताही लाभ आगाऊ देणे निषिद्ध असल्याचे स्पष्ट केल्यामुळे, सध्या लाभार्थींच्या खात्यात फक्त डिसेंबर महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता जमा होणार आहे.
महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात आदर्श आचारसंहिता लागू असल्याने, शासनाच्या कोणत्याही योजनेत अतिरिक्त किंवा आगाऊ रक्कम देणे बंदी आहे. त्यामुळे जानेवारी महिन्याचा लाभ पुढील महिन्यात म्हणजे फेब्रुवारी 2026 मध्ये मिळण्याची शक्यता आहे. हा निर्णय महाराष्ट्रातील सर्व महापालिका क्षेत्रांमध्ये लागू होणार आहे.
डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांच्या एकत्रित लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला होता, मात्र काँग्रेसने यावर आक्षेप नोंदवत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. आयोगाने तक्रारींची दखल घेत शासनाकडून स्पष्टीकरण मागवले आणि नियमांनुसार निर्णय घेतला.
मुख्य सचिवांच्या अहवालानुसार, आदर्श आचारसंहिता लागू असताना नवीन लाभ देणे किंवा आगाऊ हप्ता देणे बंदी आहे. आयोगाने स्पष्ट केले की, लाडकी बहीण योजनेचा नियमित लाभ देण्यात काही अडथळा नाही, परंतु आगाऊ रक्कम देणे शक्य नाही. तसेच, आचारसंहिता काळात नवीन लाभार्थींचा समावेशही थांबवण्यात आला आहे.
या कारणांमुळे सध्या लाभार्थींच्या खात्यात फक्त डिसेंबर महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता जमा होईल, तर बाकीचा हप्ता आचारसंहिता संपल्यानंतर दिला जाईल.