Image Source:(Internet)
मुंबई :
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आता अवघे दोन दिवस उरले असताना राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी दिलेल्या विशेष मुलाखतीत अनेक संवेदनशील मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका मांडली. हिंदुत्व, तुष्टीकरणाचे आरोप, उत्तर भारतीयांवरील हल्ले आणि निकालानंतर भाजप किंवा एकनाथ शिंदे गटासोबत जाण्याबाबत त्यांनी थेट उत्तर दिली.
तुष्टीकरणाच्या आरोपांना प्रत्युत्तर-
भाजपकडून शिवसेना (ठाकरे गट) हिंदुत्व सोडून मुस्लिम मतांसाठी तुष्टीकरण करत असल्याचा आरोप केला जात आहे. यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, “आम्ही काँग्रेससोबत गेलो म्हणून हिंदुत्व सोडलं, तर भाजपने काँग्रेससोबत हातमिळवणी केली तेव्हा त्यांनी काय सोडलं? भाजपचं हिंदुत्व हे केवळ निवडणुकीपुरतं आहे.”
गोमांस बंदीवर बोलताना त्यांनी भाजपवर दुहेरी भूमिका घेतल्याचा आरोप केला. “एकीकडे गोमांसबंदीची भाषा आणि दुसरीकडे त्यांच्या नेत्यांचे विरोधाभासी वक्तव्य—हेच भाजपचं खोटं हिंदुत्व आहे,” असा टोला त्यांनी लगावला.
आमचं हिंदुत्व स्पष्ट -
“आमचं हिंदुत्व कोणाच्या विरोधात नाही,” असे सांगत आदित्य ठाकरे म्हणाले, “हृदयात राम आणि हाताला काम हेच आमचं हिंदुत्व आहे. मराठी माणूस असो वा भूमिपुत्र, हा मुद्दा न्याय आणि हक्कासाठी आहे.”कोविड काळात धर्म, जात न पाहता सेवा दिल्याचा दाखला देत त्यांनी भाजपवर अप्रत्यक्ष टीका केली.
उत्तर भारतीयांवरील हल्ल्यांवर भूमिका-
राज ठाकरे यांच्या आंदोलनांदरम्यान उत्तर भारतीयांवर झालेल्या मारहाणीबाबत विचारले असता आदित्य ठाकरे म्हणाले, “मला ते मान्य नाही. महाराष्ट्रात आणि मुंबईत राहणारे उत्तर भारतीय माझ्यासाठी मुंबईकरच आहेत. मी कुणाला प्रांतानुसार वेगळं मानत नाही.”
कोविड काळातील मदतीचा उल्लेख-
आदित्य ठाकरे यांनी कोविड काळात स्थलांतरित मजुरांसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचाही उल्लेख केला. “तेव्हा लोकांना घरी पाठवण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. कॅम्प उभारले, ट्रेनची सोय केली आणि त्याचा खर्चही राज्य सरकारने उचलला. केंद्र सरकारकडून किंवा भाजपकडून कोणतीही आर्थिक मदत मिळाली नाही,” असा आरोप त्यांनी केला.
भाजप किंवा शिंदे गटासोबत युती?
निवडणुकीनंतर सत्तेसाठी भाजप किंवा एकनाथ शिंदे गटासोबत जाणार का, या प्रश्नावर आदित्य ठाकरे म्हणाले, चोरांसोबत आम्ही कधीच जाणार नाही. ज्यांनी घरात फूट पाडली, त्यांच्याशी युती होऊ शकत नाही.भाजपसोबत पूर्वी युती झाली होती, हे मान्य करत त्यांनी पुढे स्पष्ट केलं की, “आज भाजप महाराष्ट्राची संस्कृती आणि मुंबईचं स्वरूप बदलत आहे. बेस्टसारख्या सेवा कमकुवत केल्या जात आहेत. अदानीकरणाच्या मुद्द्यावर आमची तत्त्वं ठाम आहेत आणि त्यावर कोणतीही तडजोड होणार नाही. या वक्तव्यांमुळे निवडणुकीनंतरच्या सत्तासमीकरणांबाबत अनेक तर्कवितर्क सुरू झाले असून, आदित्य ठाकरेंची भूमिका आगामी राजकारणात महत्त्वाची ठरणार आहे.