ट्रम्प यांनी स्वतःला ‘व्हेनेझुएलाचा कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष’ घोषित केल्याने खळबळ

12 Jan 2026 12:45:38
 
Trump
 Image Source:(Internet)
न्यूयॉर्क:
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Trump) यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘ट्रुथ सोशल’वर एक फोटो शेअर करत स्वतःला थेट “व्हेनेझुएलाचा कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष” असल्याचे म्हटल्याने आंतरराष्ट्रीय राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
 
रविवारी शेअर करण्यात आलेला हा फोटो ट्रम्प यांचा अधिकृत पोर्ट्रेट असून, त्यावर त्यांच्या पदनामात “व्हेनेझुएलाचा कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष” तसेच “जानेवारी 2026 पासून वर्तमान राष्ट्राध्यक्ष” असा उल्लेख आहे. याच फोटोमध्ये ट्रम्प यांना अमेरिकेचे 45 वे आणि 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून दर्शवण्यात आले असून, त्यांनी 20 जानेवारी 2025 रोजी पदभार स्वीकारल्याचा उल्लेखही आहे.
 
दरम्यान, याच महिन्याच्या सुरुवातीला अमेरिकेने व्हेनेझुएलावर मोठी कारवाई करत तेथील राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अटक केल्याचे वृत्त आहे. मादुरो आणि त्यांची पत्नी सिलिया फ्लोरेस यांना न्यूयॉर्कला नेण्यात आले असून, त्यांच्यावर अंमली पदार्थ तस्करीच्या कटाचे आरोप ठेवत खटला चालवला जात आहे.
 
या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी निवेदनात म्हटले आहे की,
“जोपर्यंत सुरक्षित, न्याय्य आणि विवेकपूर्ण पद्धतीने सत्तांतर होत नाही, तोपर्यंत अमेरिका व्हेनेझुएलाचे संचालन करेल. व्हेनेझुएलावासीयांच्या हिताशी विसंगत विचार असलेल्या कोणत्याही व्यक्तीकडे सत्ता जाऊ देण्याचा धोका आम्ही पत्करू शकत नाही.”
 
ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे आणि सोशल मीडिया पोस्टमुळे अमेरिका–व्हेनेझुएला संबंधांमध्ये आणखी तणाव निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Powered By Sangraha 9.0