गद्दार’ घोषणांनी अंबरनाथमध्ये रणकंदन; भाजप–शिंदेसेना कार्यकर्ते आमनेसामने, चपला दाखवत गदारोळ

12 Jan 2026 18:43:32
 
BJP-Shinde Sena
 Image Source:(Internet)
अंबरनाथ:
महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या भाजप (BJP) आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात अंबरनाथमध्ये आज थेट संघर्ष पाहायला मिळाला. उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेच्या परिसरात दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते समोरासमोर आले आणि वातावरण अक्षरशः रणांगणासारखे तापले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिवसैनिकांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत ‘गद्दार, गद्दार’च्या घोषणा दिल्या, तर काही महिला कार्यकर्त्यांनी थेट चपला दाखवत निषेध व्यक्त केला.
 
अंबरनाथ नगरपरिषदेतील सत्तास्थापनेसाठी गेल्या आठवड्याभरात झालेल्या राजकीय उलथापालथीमुळे हा तणाव अधिकच वाढला आहे. उपनगराध्यक्ष पदासाठी आज मतदान होणार असल्याने सर्व पक्षांचे नगरसेवक आणि कार्यकर्ते नगरपालिकेत दाखल झाले होते. याचवेळी भाजप आणि शिंदेसेनेचे कार्यकर्ते एकमेकांसमोर येताच घोषणाबाजीला सुरुवात झाली.
 
शिंदेसेनेतून उपनगराध्यक्ष पदाचे उमेदवार असलेले सदाशिव पाटील यांच्याविरोधात भाजपच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी शिवसैनिकांना लक्ष्य करत ‘गद्दार’च्या घोषणा दिल्या. काहींनी चपला दाखवत निषेध केल्याने परिसरात मोठा गोंधळ उडाला. या प्रकारामुळे उपनगराध्यक्ष निवड प्रक्रियेदरम्यान तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
 
नेमकं काय घडलं होतं गेल्या आठवड्यात?
डिसेंबरमध्ये झालेल्या अंबरनाथ नगरपरिषद निवडणुकीत शिंदेसेनेने २७ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला. भाजपला १४, काँग्रेसला १२ तर राष्ट्रवादी काँग्रेसला ४ जागा मिळाल्या. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपच्या तेजश्री करंजुले पाटील विजयी झाल्या, त्यांनी शिंदेसेनेच्या उमेदवाराचा पराभव केला. मात्र, शिंदेसेना बहुमतापासून दूर राहिली.
 
शिंदेसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत हालचाली सुरू केल्या. भाजप–काँग्रेस युतीची चर्चा राज्यभर गाजल्यानंतर काँग्रेसच्या राज्य नेतृत्वाने आपल्या १२ नगरसेवकांना निलंबित केले. त्यानंतर भाजपने या सर्व नगरसेवकांना तात्काळ पक्षात प्रवेश देत सत्ता स्थापनेचा दावा केला.
 
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ४ नगरसेवक आपल्या बाजूने वळवत भाजपच्या डावाला चेकमेट दिला आणि सत्ता स्थापनेचा दावा मजबूत केला. या सत्तासंघर्षातूनच आज अंबरनाथ नगरपालिकेत भाजप आणि शिंदेसेना कार्यकर्त्यांमधील उघड संघर्ष उफाळून आला.
 
Powered By Sangraha 9.0