Image Source:(Internet)
मुंबई :
महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन विरोधी पक्षनेते आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तुरुंगात टाकण्याचा कट रचण्यात आला होता, असा गंभीर आरोप मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला आहे. एवढेच नव्हे तर खोटे गुन्हे दाखल करून आम्हालाही जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न झाला होता, असेही त्यांनी सांगितले. या आरोपांमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
नितेश राणे म्हणाले, खऱ्या अर्थाने सत्तेचा गैरवापर काय असतो, हे त्या काळात दिसून आलं. देवेंद्र फडणवीसांसह प्रत्येक विरोधी पक्षातील नेत्याला खोट्या गुन्ह्यांत अडकवून तुरुंगात टाकण्याचा एककलमी कार्यक्रम सुरू होता. कोरोनाच्या काळात महाराष्ट्र अधोगतीकडे जात असताना उद्धव ठाकरे सरकारचा कारभार पूर्णपणे नियोजनशून्य होता. राज्य सांभाळण्याऐवजी राजकीय प्रतिस्पर्ध्यांना जेलमध्ये टाकण्याचाच उद्योग सुरू होता. आता त्या कारभाराचा बुरखा फाटत चालला आहे, असा घणाघात त्यांनी केला.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने काही ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटासोबत युती केल्याबाबतही नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेवर बोलताना ते म्हणाले, “ते त्यांच्या अंतर्गत राजकारणाचे मुद्दे आहेत. पुणे महापालिकेची निवडणूक एकत्र लढवण्यासाठी त्यांनी संयुक्तपणे जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळांबाबतही राणे यांनी भूमिका स्पष्ट केली.कोकणातील शाळा बंद होऊ नयेत, यासाठी मी शिक्षणमंत्र्यांना पत्र दिलं आहे. गावागावातील शाळा टिकल्या पाहिजेत. मराठवाडा आणि विदर्भासाठी जे निकष आहेत, ते कोकणाला लागू करू नयेत, यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा केला जाईल,असे त्यांनी सांगितले.
महायुतीच्या प्रचाराबाबत माहिती देताना नितेश राणे म्हणाले, एकूण १२ प्रचार सभा नियोजित आहेत. महायुतीचा कार्यकर्ता म्हणून मी सर्वत्र प्रचारासाठी जाणार आहे.