मकर संक्रांतीला महिलांच्या खात्यात ३,००० रुपये? पण अडसर कुठे आहे? सविस्तर जाणून घ्या!

10 Jan 2026 22:13:01
 
Ladki Bahin Yojana
 Image Source:(Internet)
नागपूर :
महाराष्ट्रातील लाखो महिलांच्या मनात सध्या एकच प्रश्न घोळतोय — “लाडकी बहीण योजनेचा उर्वरित हप्ता नेमका कधी जमा होणार?” नोव्हेंबरचा हप्ता मिळाल्यानंतर डिसेंबर आणि जानेवारीच्या रकमेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.मकर संक्रांतीच्या (Makar Sankranti) पार्श्वभूमीवर महिलांना तब्बल ३,००० मिळणार असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत.
 
सोशल मीडिया, व्हॉट्सअ‍ॅप फॉरवर्ड आणि राजकीय चर्चांमध्ये असा दावा केला जात आहे की १४ जानेवारी रोजी डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतात.
 
मात्र, ही बातमी कितपत खरी आहे, हा मोठा प्रश्न आहे. कारण सरकारकडून अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. तरीही, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे. राज्यातील महानगरपालिका निवडणुकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून, त्याच्या आदल्या दिवशी निधी जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
 
दरम्यान, भाजपचे उमेदवार तेजस्वी घोसाळकर यांनी मकर संक्रांतीच्या दिवशी महिलांना हा लाभ मिळेल, असा दावा केल्याने चर्चेला आणखी वेग आला आहे. काही राजकीय अभ्यासकांच्या मते, निवडणुकीआधी घेतला जाणारा असा निर्णय मतदारांवर प्रभाव टाकू शकतो.
 
पण दुसरीकडे, महिला व बालविकास विभागातील अधिकाऱ्यांचे मत वेगळे आहे. त्यांच्या मते, सध्या राज्यात निवडणूक आचारसंहिता लागू असून, अशा स्थितीत नवीन निधी वितरित करणे प्रशासकीयदृष्ट्या कठीण ठरू शकते. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत लाभार्थ्यांना प्रतीक्षा करावी लागू शकते, असेही संकेत दिले जात आहेत.
 
खरे तर अनेक महिलांना डिसेंबरमध्येच ३,००० मिळण्याची अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात त्यांच्या खात्यात फक्त नोव्हेंबरचा हप्ता जमा झाल्याने संभ्रम वाढला आहे. त्यामुळे आता सरकार १४ जानेवारी रोजी दोन्ही महिन्यांचे पैसे देणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 
यातच आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ई-केवायसी. लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी ३१ डिसेंबर २०२५ ही अंतिम तारीख देण्यात आली होती. ही मुदत आता संपली असून, ई-केवायसीचा पर्याय पोर्टलवरून हटवण्यात आल्याची माहिती आहे. ज्यांनी अद्याप ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांच्यासाठी ही मोठी अडचण ठरू शकते. सध्या तरी मुदतवाढीबाबत सरकारकडून कोणतेही स्पष्ट संकेत नाहीत.
 
१४ जानेवारी रोजी निधी जमा होणार की नाही, हे पूर्णतः अधिकृत घोषणेवर अवलंबून आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत हा विषय कळीचा ठरला आहे. लाभार्थी महिलांनी आपल्या बँक खात्याची स्थिती, आधार लिंकिंग आणि केवायसी तपशील वेळोवेळी तपासण्याचे आवाहन केले जात आहे.
 
दरम्यान, केवायसी पूर्ण असूनही अनेक महिलांच्या खात्यात रक्कम जमा न झाल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. यामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील महिला मोठ्या संख्येने महिला व बालविकास कार्यालयात चौकशीसाठी गर्दी करत आहेत. प्राथमिक तपासणीत ई-केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडल्यामुळे अडचण निर्माण झाल्याचे समजते. मात्र, सध्या तरी या समस्येवर तात्काळ तोडगा नसल्याचे चित्र आहे.
Powered By Sangraha 9.0