Image Source:(Internet)
नवी दिल्ली :
भारत (India)–अमेरिका व्यापार संबंधांबाबत मोठी आणि खळबळजनक माहिती समोर आली आहे. अमेरिकेचे वाणिज्य मंत्री हॉवर्ड लुटनिक यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना एक फोन केला असता तर भारत आणि अमेरिकेमध्ये मोठा व्यापारी करार कधीच झाला असता, असा दावा लुटनिक यांनी केला आहे.
एका पॉडकास्टमध्ये बोलताना लुटनिक म्हणाले की, ट्रम्प यांना पंतप्रधान मोदी फोन करतील अशी अपेक्षा होती. मात्र मोदींनी ट्रम्प यांच्याशी थेट संपर्क साधलाच नाही. अमेरिकेने भारतावर टॅरिफ लावल्यानंतर दोन्ही देशांमध्ये मोठ्या व्यापारी कराराबाबत चर्चा सुरू होती. सर्व गोष्टी अनुकूल राहिल्या असत्या तर डिसेंबर २०२५ मध्ये हा करार अंतिम झाला असता, मात्र तसे घडले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
लुटनिक यांच्या म्हणण्यानुसार, डील जवळपास पूर्ण झाली होती. मात्र डोनाल्ड ट्रम्प हे कोणत्याही करारावर अंतिम निर्णय स्वतःच घेतात. त्यामुळे त्यांना मोदींकडून थेट फोन येईल अशी अपेक्षा होती. मात्र मोदींनी फोन न केल्याने ही प्रक्रिया अडकली. विशेष म्हणजे, करार जवळपास निश्चित झाल्यानंतरही अमेरिकेने त्यातील काही अटी बदलल्याचे लुटनिक यांनी मान्य केले.
भारताने यावर आक्षेप घेतला असता, “आधी ठरलेल्या अटींवर तुम्ही सहमत होता, आता अचानक बदल का?” असा सवाल केल्याचे लुटनिक यांनी सांगितले. मात्र अमेरिकेची भूमिका बदलल्याने भारताने ठाम भूमिका घेतली. दरम्यान, भारतासोबत चर्चा सुरू असतानाच अमेरिकेने इंडोनेशिया, फिलिपाईन्स आणि व्हिएतनामसोबत व्यापारी करार केले.
पंतप्रधान मोदी यांनी ट्रम्प यांना फोन न केल्यामुळेच भारत–अमेरिका डील रखडल्याचा दावा अमेरिकेकडून केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर, ट्रम्प यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर श्रेय घेण्याची संधी मिळाली नाही, त्यामुळे नाराज झालेल्या ट्रम्प यांनी भारतावर तब्बल ५०० टक्के टॅरिफ लावण्याची धमकी दिल्याची चर्चा आहे.
मोदींनी ट्रम्प यांना फोन का केला नाही?
डोनाल्ड ट्रम्प यांचा मागील अनुभव लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत सावध धोरण स्वीकारल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. ट्रम्प अनेकदा घाईघाईत निर्णय घेतात आणि स्वतःचीच बाजू पुढे रेटण्याचा प्रयत्न करतात. जपान आणि ब्रिटनसारख्या देशांना याचा अनुभव आलेला आहे. त्यामुळे ट्रम्प यांना कोणतीही अशी संधी देऊ नये, ज्याचा वापर ते वैयक्तिक प्रतिष्ठेसाठी करू शकतील, या भूमिकेतूनच मोदींनी थेट फोन न केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.
एकूणच, भारताने दबावाला न झुकता घेतलेली ठाम भूमिका ही आंतरराष्ट्रीय व्यापार धोरणात ‘मास्टरस्ट्रोक’ ठरत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.