Image Source:(Internet)
नागपूर :
राज्यात बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे शासकीय लाभ घेणाऱ्यांविरोधात प्रशासनाने कडक भूमिका घेतली असून शिक्षण खात्यात मोठी खळबळ उडाली आहे. दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंडे (Tukaram Munde) यांनी दिलेल्या स्पष्ट सूचनांनंतर रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यांत प्राथमिक शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात बनावट दिव्यांग प्रमाणपत्रे व विविध भत्त्यांचा गैरवापर केल्याप्रकरणी तीन प्राथमिक शिक्षकांना तात्काळ निलंबित करण्यात आले. चौकशीत या शिक्षकांनी प्रत्यक्ष अपंगत्वापेक्षा जास्त टक्केवारी दर्शवणारी प्रमाणपत्रे सादर केल्याचे उघड झाले असून, शासनाची दिशाभूल केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातही अशीच कारवाई करण्यात आली असून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी एकाच वेळी १३ प्राथमिक शिक्षकांना निलंबित केले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या तपासात या शिक्षकांनी सीपीआर रुग्णालयासह इतर वैद्यकीय संस्थांकडून घेतलेली आजार व दिव्यांग प्रमाणपत्रे चुकीची असल्याचे निष्पन्न झाले आहे.
सोयीच्या बदल्यांसाठी आणि इतर लाभांसाठी प्रमाणपत्रांचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारीनंतर जिल्ह्यातील ३५५ शिक्षकांची फेरतपासणी करण्यात आली. त्यामध्ये २६ शिक्षक दोषी आढळले, ३०२ शिक्षकांचे अहवाल योग्य ठरले, तर उर्वरित ५३ शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची चौकशी अद्याप सुरू आहे.
दोष सिद्ध झालेल्या १३ शिक्षकांना निलंबित करून त्यांना विविध पंचायत समित्यांमध्ये हजेरी लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे शिक्षक भुदरगड, राधानगरी, कागल, करवीर, शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यांतील असल्याची माहिती आहे.
दरम्यान, आणखी १५ शिक्षक संशयाच्या भोवऱ्यात असून त्यांच्या वैद्यकीय तपासणीचे नमुने मुंबईतील जे. जे. व ससून रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार असून, या कारवाईमुळे बोगसगिरी करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.