उल्हासनगरात मोठा राजकीय उलटफेर; शिवसेना-टीओके युती जाहीर, भाजपला धक्का

08 Sep 2025 10:03:16
 
Ulhasnagar
 (Image Source-Internet)
उल्हासनगर :
उल्हासनगर (Ulhasnagar) महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणात नवे समीकरण तयार झाले आहे. शिवसेना आणि टीम ओमी कलानी (टीओके) यांनी एकत्र येत निवडणूक लढवण्याची घोषणा केली असून यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. शनिवारी रात्री कलानी यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत या युतीची अधिकृत घोषणा करण्यात आली.
 
उल्हासनगरमधील कलानी कुटुंब राजकारणाचा केंद्रबिंदू मानले जाते. अनेक वर्ष तुरुंगवास भोगल्यानंतर माजी आमदार सुरेश ऊर्फ पप्पू कलानी सध्या बाहेर असून पुन्हा सक्रिय झाले आहेत. भाजप आणि कलानी यांच्यातील वैर हे स्थानिक राजकारणातील जुनं वास्तव आहे. यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत टीओके ने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना साथ दिली होती. यानंतर शिंदे-कलानी यांची जवळीक वाढली आणि शहरात “दोस्ती का गठबंधन” अशी चर्चा रंगली होती.
 
अलीकडेच धार्मिक कार्यक्रमासाठी शहरात आलेल्या खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ओमी कलानी यांच्यासोबत एका गाडीतून प्रवास केला होता. त्यानंतर दोघांची शिंदे यांच्या निवासस्थानी बैठक झाली होती. दुसरीकडे भाजपने कलानी गटातील काही कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात दाखल करून त्यांना राजकीय धक्का देण्याचा प्रयत्न केला होता.
 
मात्र, आता शिवसेना आणि टीओके युती झाल्याने महापालिका निवडणुकीत भाजपविरोधी आघाडी मजबूत होणार आहे. या बदलत्या समीकरणामुळे उल्हासनगरच्या राजकारणात नव्या घडामोडींना वेग आला आहे. भाजप या आव्हानाला कशी तोंड देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Powered By Sangraha 9.0