- 15 सप्टेंबरला विराट मोर्चाची घोषणा
(Image Source-Internet)
नागपूर:
महाराष्ट्रात आरक्षणाचा (Reservation) मुद्दा पुन्हा पेट घेताना दिसतोय. मराठा समाजासाठी हैदराबाद गॅझेटनुसार शासनाने काढलेल्या जीआरनंतर ओबीसी समाजाने आक्रमक भूमिका घेतली. याच पार्श्वभूमीवर आता बंजारा समाजानेही थेट रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेत राज्य सरकारसमोर नवी अडचण निर्माण केली आहे.
मराठा समाजाला यश, ओबीसींचा तीव्र विरोध
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत उभारलेल्या मराठा आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर शासनाने जीआर काढत हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला. मात्र, ओबीसी समाजाने याला तीव्र विरोध दर्शवला असून, “मराठ्यांना ओबीसीमधील आरक्षण मान्य होणार नाही,” अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे. या निर्णयाविरोधात न्यायालयीन लढाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
बंजारा समाजाची ठाम भूमिका-
बीडमध्ये झालेल्या जिल्हास्तरीय सभेत बंजारा समाजाने मोठ्या संख्येने हजेरी लावली. या बैठकीत “हैदराबाद गॅझेटप्रमाणे आम्हाला एसटी आरक्षणात समाविष्ट करा” ही मागणी जोरदारपणे मांडण्यात आली. त्यासाठी 15 सप्टेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत विराट मोर्चा काढण्याचा ठराव घेण्यात आला.
राज्य सरकारची वाढलेली चिंता-
आमच्या आरक्षणाचा प्रश्न त्वरित निकाली काढा, अन्यथा राज्यभर रस्ते रोको आंदोलन करू, असा इशारा बंजारा समाजाच्या नेत्यांनी दिला आहे. त्यामुळे आधीच मराठा आणि ओबीसी समाजाच्या संघर्षामुळे तणावग्रस्त झालेल्या राज्यातील वातावरण आणखी पेटण्याची शक्यता आहे.