अजितदादांवरून राज्यात खळबळ; रोहित पवार काकांच्या बचावासाठी मैदानात

06 Sep 2025 15:05:17
 
Rohit Pawar on Ajit Pawar
 (Image Source-Internet)
मुंबई :
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यातील फोनवरील संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. विरोधकांनी अजित पवारांवर आरोपांची सरबत्ती केली असून, आता त्यांना घरातूनच साथ मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी काकांच्या बचावासाठी उघडपणे मैदानात उतरून, या प्रकरणाला जाणीवपूर्वक वेगळा रंग दिला जात असल्याचा दावा केला आहे.
 
रोहित पवारांचे समर्थन-
रोहित पवार यांनी सोशल मीडियावर लिहिले –
“करमाळा तालुक्यातील मुरूमाच्या बेकायदेशीर उत्खनन प्रकरणी अजितदादांचे संभाषण जाणीवपूर्वक ट्विस्ट करून मांडले गेले आहे. महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा व्हायला हवी होती, मात्र मुद्दाम वाद निर्माण केला जात आहे.”
 
त्यांनी अजित पवारांच्या स्वभावाबद्दल सांगितले की, “अजितदादा स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. त्यांचा बोलण्याचा ढंग कठोर वाटू शकतो, पण गेल्या ३५-४० वर्षांपासून महाराष्ट्राला त्यांची कार्यशैली परिचित आहे.” तसेच, या प्रकरणात महिला अधिकाऱ्याची काहीही चूक नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 
विरोधकांचा जोरदार हल्ला-
दरम्यान, शिवसेना (ठाकरे गट) चे खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांवर घणाघात केला.
“अजित पवार चोरांना संरक्षण देतात, अशा नेत्याला सरकारमध्ये राहण्याचा अधिकार नाही,” असा आरोप राऊत यांनी केला.
तसेच, “एकीकडे ते आयपीएस अधिकाऱ्यांना बेकायदेशीर कामांना पाठिंबा देतात आणि दुसरीकडे इतरांना कायद्याचे धडे देतात,” अशी टीका त्यांनी पत्रकार परिषदेत केली.
Powered By Sangraha 9.0