केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिलासा; महागाई भत्ता वाढण्याची दाट शक्यता

06 Sep 2025 16:23:15
 
dearness allowance
 (Image Source-Internet)
नवी दिल्ली :
केंद्र सरकारकडून लवकरच लाखो कर्मचाऱ्यांना आणि निवृत्तांना महत्त्वाचा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. महागाई भत्ता (Dearness allowance) (DA) आणि महागाई दिलासा (DR) ३ टक्क्यांनी वाढणार असल्याची माहिती समोर आली आहे.
 
जुलैपासून लागू, ऑक्टोबरमध्ये मिळेल थकीत रक्कम
सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५५ टक्के आहे. प्रस्तावित वाढीनंतर तो ५८ टक्क्यांवर पोहोचेल. ही वाढ जुलै २०२५ पासून लागू होणार असून, जुलै ते सप्टेंबर या कालावधीतील थकीत रक्कम ऑक्टोबर महिन्यातील पगारासोबत मिळण्याची शक्यता आहे.
 
दरवर्षी दोनदा होतो निर्णय
सरकार दर सहा महिन्यांनी महागाई भत्त्याचा आढावा घेते.
जानेवारी-जून कालावधीतील वाढीची घोषणा प्रामुख्याने होळीपूर्वी
जुलै-डिसेंबर कालावधीतील वाढीची घोषणा दिवाळीपूर्वी
यंदाची दिवाळी २०-२१ ऑक्टोबर रोजी असल्याने, निर्णय ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 
कसा ठरतो महागाई भत्ता?
महागाई भत्त्याची गणना औद्योगिक कामगारांसाठी ग्राहक किंमत निर्देशांक (CPI-IW) यावर केली जाते. जुलै २०२४ ते जून २०२५ या काळातील या निर्देशांकाचा सरासरी आकडा १४३.६ इतका नोंदवला गेला आहे. त्यावरून ५८% महागाई भत्ता ठरवला जाऊ शकतो. विशेष म्हणजे, ही वाढ ७व्या वेतन आयोगाच्या शेवटच्या कालावधीत लागू होणार आहे. या आयोगाचा कार्यकाळ ३१ डिसेंबर २०२५ रोजी संपणार आहे.
 
८व्या वेतन आयोगाबाबत उत्सुकता
कर्मचाऱ्यांचे आता लक्ष आगामी ८व्या वेतन आयोगाकडे लागले आहे. जानेवारी २०२५ पासून तो लागू होईल, असे संकेत मिळत आहेत. मात्र अद्याप आयोगाचे अधिकार क्षेत्र (Terms of Reference) जाहीर झालेले नाही. अध्यक्ष व सदस्यांच्या निवडीची प्रक्रिया सुरू आहे. साधारणतः आयोगाच्या शिफारशींना प्रत्यक्षात अंमलात यायला दोन वर्षांचा कालावधी लागतो. त्यामुळे २०२७ च्या अखेरीस किंवा २०२८ च्या सुरुवातीला वेतनवाढ प्रत्यक्ष लागू होऊ शकते.
Powered By Sangraha 9.0