(Image Source-Internet)
मुंबई :
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आझाद मैदानात मोठ्या आंदोलनाची हाक दिली होती. पाच दिवस सलग सुरू राहिलेल्या या आंदोलनात लाखो मराठा बांधव सहभागी झाले. मात्र, या काळात शहरातील वाहतूक कोंडी वाढली आणि गणेशोत्सवासाठी (Ganeshotsav) आलेल्या भाविकांनाही प्रचंड गैरसोय सहन करावी लागली. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे.
दक्षिण मुंबईत आंदोलने नकोत –
देवरांनी ३ सप्टेंबर रोजी पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे की, दक्षिण मुंबई हे राज्याचे राजकीय आणि आर्थिक केंद्र आहे. मंत्रालय, विधानभवन, नौदल मुख्यालय, पोलीस आयुक्तालय, बँका आणि अनेक महत्त्वाच्या कंपन्यांची कार्यालये येथे आहेत. आंदोलने झाल्यास प्रशासकीय कामकाज ठप्प होते आणि लाखो लोकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होते.
"आंदोलन करणे हा लोकशाहीतील अधिकार आहे; पण त्याचा फटका सामान्य नागरिकांना बसू नये. रस्ते बंद होणे, वाहतूक थांबणे यामुळे नोकरीला जाणारे, उद्योगधंदे करणारे लोक अडचणीत सापडतात. त्यामुळे दक्षिण मुंबईऐवजी शहराबाहेरील ठिकाणी आंदोलने आयोजित करावीत," अशी मागणी देवरा यांनी केली आहे.
संजय राऊतांचा हल्लाबोल-
देवरांच्या या पत्रावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यांनी सोशल मीडियावर लिहिलं – "शिंदे गटाचा हा खरा चेहरा आहे. मराठी माणूस न्याय्य मागणीसाठी मुंबईत एकवटला, याचीच त्यांना चीड आहे. मराठी बांधवांच्या आंदोलनाला दक्षिण मुंबईत परवानगी देऊ नका, असं म्हणणारे बाळासाहेबांचा फोटो वापरण्याचा अधिकार गमावून बसले आहेत."
दरम्यान, या संपूर्ण घडामोडीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही. मात्र, मिलिंद देवरांच्या पत्रामुळे राजकीय वर्तुळात नवी चर्चा रंगू लागली असून, सरकारची पुढील भूमिका काय असेल याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.