(Image Source-Internet)
नागपूर :
बुधवारी मध्यरात्रीनंतर नागपूरपासून (Nagpur) अवघ्या ४० किमी अंतरावर असलेल्या चकडोह-बाजारगाव येथील सोलर ग्रुपच्या T-15 विस्फोटक निर्मिती केंद्रात प्रचंड स्फोट झाला. या अपघातात एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला असून तब्बल ३० जण जखमी झाले आहेत. यापैकी चार जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.
स्फोट इतका तीव्र होता की संपूर्ण युनिट हादरले. मृत कामगाराचा मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आला आहे. नऊ जखमींना तातडीने नागपूरमधील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले, तर इतरांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत.
सोलर ग्रुप हे संरक्षण आणि व्यापारी क्षेत्रासाठी स्फोटक बनविणारे अग्रगण्य उद्योग असून, गेल्या दोन वर्षांत घडलेली ही दुसरी मोठी दुर्घटना आहे. डिसेंबर २०२३ मध्ये याच कंपनीत झालेल्या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला होता.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, स्फोटानंतर परिसरात प्रचंड धुराचे लोट पसरले आणि ७०० मीटरच्या परिसरात काम करणारे अनेक कर्मचारी गंभीर जखमी झाले. घटनेनंतर संपूर्ण भागात भीतीचे सावट पसरले असून पोलिस व आपत्कालीन पथके मदतकार्याला लागली आहेत.