(Image Source-Internet)
मुंबई :
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणुका दिवाळीनंतर जाहीर होतील, अशी चर्चा रंगत असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.
एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार म्हणाले की, काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कदाचित जानेवारी महिन्यात होतील. मात्र याबाबत त्यांच्याकडे ठोस माहिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “आता पुन्हा म्हणतील मीच जानेवारीत निवडणुका होतील असं सांगितलं, पण प्रत्यक्षात याची जबाबदारी माझ्याकडे नाही,” असेही पवार म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, निवडणूक घेण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाचा आहे. 2017 नंतर 2022 साली या निवडणुका होणे अपेक्षित होते. मात्र 2022, 2023 आणि 2024 ही वर्षं उलटून गेली आणि आता 2025 देखील संपत आले आहे. निवडणुका लांबण्यामागील कारणांच्या खोलात मी जाणार नाही, असं सांगत पवारांनी निवडणुका पुढे ढकलल्या गेल्याचे मान्य केले. तसेच सर्व घटकांना प्रतिनिधित्व मिळावे म्हणूनही विलंब झाल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, अजित पवार यांच्या या विधानामुळे निवडणुका पुन्हा पुढे ढकलल्या जातील का, हा प्रश्न उपस्थित झाला असून यावरून राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.