(Image Source-Internet)
नवी दिल्ली :
देशभरातील ग्राहकांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेत ५६व्या जीएसटी (GST) परिषद बैठकीत कर संरचनेत बदल करण्यात आला. ३ आणि ४ सप्टेंबरला झालेल्या या बैठकीत जीएसटीचे चार टप्पे रद्द करून आता फक्त दोनच स्लॅब लागू करण्यात आले आहेत. म्हणजेच, ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच दर लागू राहतील. यापूर्वी असलेले १२ टक्के आणि २८ टक्के करदर रद्द करण्यात आले असून नवे दर २२ सप्टेंबरपासून अंमलात येतील.
या निर्णयामुळे दैनंदिन वापरातील अनेक वस्तू व सेवा आता स्वस्त होणार आहेत. १२ टक्के कराच्या श्रेणीतील वस्तू ५ टक्क्यांमध्ये तर २८ टक्के कराच्या श्रेणीतील वस्तू १८ टक्क्यांमध्ये समाविष्ट केल्या आहेत.
आता या वस्तू स्वस्त-
केसांचे तेल, शाम्पू, टूथपेस्ट, साबण, शेव्हिंग क्रीम, बटर, तूप, चीज, नमकीन, भुजिया, डायपर, बाळांचे नॅपकिन्स, शिवणयंत्रे आणि त्यांचे सुटे भाग यावर आता फक्त ५% जीएसटी आकारला जाईल.
आरोग्यविषयक वस्तू जसे की थर्मामीटर, मेडिकल ऑक्सिजन, डायग्नोस्टिक किट, ग्लुकोमीटर, चष्मे यावरही करदर ५% झाला आहे. यामुळे उपचार व तपासणीसाठी लागणाऱ्या अनेक गोष्टी स्वस्त होतील.
विद्यार्थ्यांसाठी लागणारे नकाशे, चार्ट, ग्लोब, पेन्सिली, शार्पनर, रंगीत खडू, वह्या, खोडरबर आता कमी दरात उपलब्ध होतील.
शेतीसाठी लागणारे ट्रॅक्टर, टायर, सुटे भाग, ठिबक सिंचन व स्प्रिंकलर यंत्रणा, जैव कीटकनाशके यावरही ५% करदर लागू होईल.
ऑटोमोबाईल क्षेत्रातील पेट्रोल, डिझेल व हायब्रीड गाड्या, तीनचाकी वाहने आणि ३५० सीसीपर्यंतच्या बाईकवर आता १८% कर लागेल. यापूर्वी या श्रेणीत २८% कर होता.
इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये एसी, मोठे एलईडी-एलसीडी टीव्ही, प्रोजेक्टर, डिशवॉश मशीन यावर आता १८% जीएसटी लागू होईल.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं की, दूध, भाकरी, आरोग्य व जीवन विमा आणि ३३ औषधे या वस्तूंवर कोणताही कर आकारला जाणार नाही. या बदलांमुळे ग्राहकांच्या खिशाला थेट दिलासा मिळणार आहे.